Join us  

Ajinkya Rahane : अजिंक्य रहाणेचे दमदार शतक; श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी सांगितली दावेदारी

खराब फॉर्माशी झगडणाऱ्या अजिंक्य रहाणेनं ( Ajinkya Rahane) रणजी करंडक ( Ranji Trophy) स्पर्धेत पुनरागमन करताना खणखणीत शतक झळकावले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2022 3:59 PM

Open in App

खराब फॉर्माशी झगडणाऱ्या अजिंक्य रहाणेनं ( Ajinkya Rahane) रणजी करंडक ( Ranji Trophy) स्पर्धेत पुनरागमन करताना खणखणीत शतक झळकावले. मागील दोन वर्षांत अजिंक्यला टीम इंडियासाठी समाधानकारक कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे निवड समिती व संघ व्यवस्थापानाने त्याला रणजी स्पर्धेत खेळून फॉर्म परत कमावण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार तो रणजी करंडक स्पर्धेत मुंबई संघाकडून आज मैदानावर उतरला आणि चेतेश्वर पुजाराचा सौराष्ट्रविरुद्ध शतकी खेळी केली. 

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत अजिंक्यला ६ डावांत १३६ धावा करता आल्या आहेत. तीन सामन्यांच्या मालिकेत  रहाणेनं ४८, २०, ०, ५८, ९ व १ अशा धावा केल्या होत्या. रहाणेनं २०२० मध्ये अखेरचं शतक झळकावलं होते. रहाणेनं २०२० व २०२१ मध्ये अनुक्रमे ३८.८५ व १९.५७च्या सरासरीनं धावा केल्या आहेत. त्याने  मागील १४ सामन्यांत २०.८४च्या सरासरीनं ५२१ धावा केल्या आहेत. त्यामुळे रहाणेसह चेतेश्वर पुजारा यांना रणजी करंडक स्पर्धेत खेळण्याचा सल्ला बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने दिला होता.

मुंबईची ३ बाद ४४ धावा अशी अवस्था झाली असताना अजिंक्य व सर्फराज खान यांनी डाव सावरला.  दोघांनी चौथ्या विकेटसाठी आतापर्यंत १७४ धावांची भागीदारी केली आहे. कर्णधार पृथ्वी शॉ ( १) तिसऱ्या षटकात बाद झाला. त्यापाठोपाठ आकर्षित गोमेल (  ८) व एसएम यादव ( १९) हे माघारी परतल्याने मुंबईचा संघ अडचणीत आला होता. अनुभवी अजिंक्यने संयमी खेळ करताना सर्फराजला सोबत घेतले. अजिंक्यने २११ चेंडूंत १४ चौकार व २ षटकारांसह शतक पूर्ण केले. सर्फराजही ८५ धावांवर खेळत आहे आणि मुंबईच्या ३ बाद २१९ धावा झाल्या आहेत.  

टॅग्स :अजिंक्य रहाणेरणजी करंडकमुंबई
Open in App