भारताच्या मधल्या फळीतील सक्षम पर्याय म्हणून केदार जाधवकडे ( Kedar Jadhav) एकेकाळी पाहिले जात होते, परंतु गेली तीनेक वर्ष तो क्रिकेटपासून दूरच आहे. भारताकडून २०२०मध्ये त्याने अखेरचा वन डे, तर २०१७मध्ये अखेरचा ट्वेंटी-२० सामना खेळला होता. इंडियन प्रीमिअर लीगमध्ये तो चेन्नई सुपर किंग्सचा महत्त्वाचा खेळाडू होता, परंतु दुखापत, खराब फॉर्म यामुळे महेंद्रसिंग धोनीनेही त्याला CSK तून दूर केले. पण, तीन वर्षानंतर मैदानावर उतरलेल्या केदार जाधवनेरणजी करंडक स्पर्धेत ( Ranji Trophy) आक्रमक फटकेबाजी केली. महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या केदारने आज आसामच्या गोलंदाजांना बदड बदड बदडले...
डिसेंबर २०१८ मध्ये केदारने छत्तीसगडविरुद्ध प्रथम श्रेणी क्रिकेटमधील शेवटचे शतक झळकावले होते. त्यानंतर आज त्याने प्रथम श्रेणीत शतकी खेळी केली. भारताकडून ७३ वन डे सामन्यांत ४२.०९च्या सरासरीने १३८९ धावा अन् ट्वेंटी-२०त ९ सामन्यांत १२२ धावा करणाऱ्या केदारची फटकेबाजी पाहून आज चाहते खूश झाले. वन डेत त्याच्या नावावर २७ विकेट्सही आहेत. पुण्यातील डी वाय पाटील अकादमीवर सुरू असलेल्या रणजी करंडक स्पर्धेतील सामन्यात आसामने पहिल्या डावात २७४ धावा केल्या. त्याला महाराष्ट्राकडून जोरदार प्रत्युत्तर मिळाले.
सलामीवीर पी शाह १८ धावांवर बाद झाला. त्यानंतर एस वीर व एन शेख यांनी महाराष्ट्राचा डाव सावरला. या दोघांची ७३ धावांची भागीदारी शेखच्या ( ४७ ) विकेटने संपुष्टात आली. त्यानंतर केदार मैदानावर आला आणि त्याने आक्रमक फटकेबाजी सुरू केली. महाराष्ट्राने दुसऱ्या दिवसअखेर २ बाद ३०७ धावा करताना ३३ धावांची आघाडी घेतली आहे. वीर २७४ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांच्या मदतीने ९४ धावांवर खेळतोय. केदारने १४६ चेंडूंत नाबाद १४२ धावा चोपल्या आहेत. त्याने १४ चौकार व ६ षटकार असे अवघ्या २० चेंडूंत ९२ धावा कुटल्या आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: Ranji Trophy 2022 : Kedar Jadhav scored 142 runs (14x4, 6x6) against Assam in his comeback First-Class match for Maharashtra after three years
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.