बंगळुरू : ४१ वेळा विजेता असलेला मुंबई संघ शनिवारी पुन्हा एकदा रणजी करंडकाच्या अंतिम फेरीत दाखल झाला. अंतिम फेरी गाठण्याची मुंबईची ही ४७ वी वेळ ठरली. या संघाने उपांत्य सामन्यात उत्तर प्रदेशवर पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर विजय मिळविला आहे. मुंबईची विजेतेपदासाठी मध्य प्रदेश विरुद्ध लढत २२ जूनपासून चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. दुसऱ्या उपांत्य सामन्यात मध्य प्रदेशने बंगालला हरवून २३ वर्षांनंतर अंतिम फेरीत धडक दिली.
मुंबईने पहिल्या डावात ३९३ धावा केल्यानंतर उ. प्रदेशला १८० धावात गुंडाळले होते. शुक्रवारी चौथ्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी यशस्वी जैस्वाल १८१ आणि अरमान जाफर १२७ यांच्या शतकी खेळीच्या बळावर ४ बाद ४४९ असा डोंगर उभारला होता. मुंबईची एकूण आघाडी ६६२ धावांची होताच अंतिम फेरीदेखील निश्चित झाली. शनिवारी मैदान ओले असल्याने उपाहारानंतर खेळ सुरू झाला. सरफराज खान नाबाद ५९ आणि शम्स मुलानी नाबाद ५१ यांनी प्रतिस्पर्धी कमकुवत गोलंदाजीचा लाभ घेतला. दोघांची अर्धशतके होताच उभय कर्णधारांनी सामना थांबविण्याचा निर्णय घेतला. यशस्वी सामनावीर ठरला.
बंगालची शरणागती
डावखुरा फिरकी गोलंदाज कुमार कार्तिकेयच्या पाच बळींमुळे मध्य प्रदेशने बंगालचा पराभव केला. बंगालला विजयासाठी ३५० धावांची गरज असताना कालच्या ४ बाद ९६ वरून हा संघ २८.२ षटकात १७५ धावात बाद झाला. कार्तिकेयने सामन्यात आठ गडी बाद केले. बंगालकडून कर्णधार अभिमन्यू ईश्वरन याने सर्वाधिक ७८ धावा केल्या, मात्र तोदेखील कार्तिकेयच्या माऱ्यापुढे चाचपडताना दिसला.
Web Title: Ranji Trophy 2022: Mumbai will play against Madhya Pradesh in the final of Ranji Trophy
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.