Ranji Trophy 2022 : Prithvi Shaw - रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत मुंबईने आतापर्यंत २८९ धावांची आघाडी घेतली आहे. मुंबईच्या पहिल्या डावातील ३९३ धावांच्या प्रत्युत्तरात उत्तर प्रदेशचा डाव १८० धावांवर गडगडला. पहिल्या डावातील २१३ धावांच्या आघाडीत मुंबईने झटपट धावा जोडण्याचा प्रयत्न केला. कर्णधार पृथ्वी शॉ सुसाट सुटला... त्याने व यशस्वी जैस्वालने डावाची सुरुवात केली, परंतु ५२ चेंडू खेळूनही यशस्वीने धावांचे खाते उघडले नाही. तेच दुसरीकडे संघाच्या ६६ धावांपैकी ६४ धावा या एकट्या पृथ्वीने चोपल्या.
हार्दिक तामोरे ( ११५) व यशस्वी ( १००) यांच्या शतकाच्या जोरावर मुंबईने पहिल्या डावात ३९३ धावा केल्या. पृथ्वी पहिल्या डावात भोपळ्यावर बाद झाला. शाम्स मुलानी ( ५०), सर्फराज खान ( ४०), सुवेध पारकर ( ३२) व तनुष कोटियन ( २२) यांनी धावसंख्येत हातभार लावला. उत्तर प्रदेशच्या करन शर्माने ( ४-४६), सौरभ कुमार ( ३-१०७) व यश दयाल ( २-५१) यांनी विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात उत्तर प्रदेशच्या फलंदाजांना अपयश आले. तुषार देशपांडे, मोहित अवस्थी व कोटियन यांच्या सुरेख माऱ्यासमोर उत्तर प्रदेशचे फलंदाज ढेपाळले. शिवम मावीने सर्वाधिक ४८ धावा केल्या. सलामीवीर माधन कौशिकने ३८ , तर कर्णधार करन शर्माने २७ धावा केल्या. उत्तर प्रदेशचा पहिला डाव १८० धावांवर गडगडला. तुषार ( ३-३४), मोहित ( ३-३९) व कोटियन ( ३-३५) यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या.
दुसऱ्या डावात मुंबईसाठी कर्णधार पृथ्वीने दमदार सुरुवात केली. त्याने ७१ चेंडूंत १२ चौकारांसह ६४ धावा केल्या. मुंबईच्या फलकावर ६६ धावांपैकी ६४ धावा या पृथ्वीच्या होत्या. नॉन स्ट्राईकला असलेल्या यशस्वीने ५४ चेंडूंनंतर पहिली धाव घेतली अन् टाळ्यांचा कडकडाट झाला.