भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुनने रणजी क्रिकेट स्पर्धेत गोवा संघाकडून पदार्पण करताना शतक झळकावले. १९८८ मध्ये सचिननेही रणजी करंडक स्पर्धेच्या पदार्पणात शतकी खेळी केली होती. पहिल्याच रणजी सामन्यात शतक ठोकून वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवणाऱ्या अर्जुनचे सोशल मिडीयावर जोरदार कौतुक झाले. पण, अर्जुनच्या या शतकाचे कौतुक करताना सामन्यातील खरा स्टार प्रसिद्धीपासून दूरच राहिला. अर्जुनने गोवा संघाकडून राजस्थानविरुद्ध १२० धावा केल्या, पण, याच सामन्यात गोव्याच्या सुयश प्रभुदेसाईने २१२ धावांची खेळी केली आणि संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली.
पोर्वोरिम क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या क गटातील सामन्यात गोव्याने त्यांची पहिली विकेट लवकर गमावली. त्यानंतर सुयश प्रभुदेसाई तिसऱ्या क्रमांकावर आला. अनिकेत चौधरी, कमलेश नागरकोटीसारखे अनुभवी गोलंदाज समोर होते, पण प्रभूदेसाईने दमदार खेळ केला. एका बाजूने विकेट पडत राहिल्या, पण सुयशने ४१६ चेंडूत २१२ धावा ठोकल्या. अर्जुन तेंडुलकरसोबत त्याने सहाव्या विकेटसाठी २२१ धावांची भागीदारी केली. यादरम्यान त्याच्या बॅटमधून २९ चौकार आले. गोव्याला दुसऱ्या दिवशीचा खेळ संपेपर्यंत ८ विकेट्स गमावून ४९३ धावा केल्या होत्या आणि त्यांनी आज ९ बाद ५४७ धावांवर डाव घोषित केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"