२०२१ मध्ये सिडनी कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या वेगवान माऱ्यासमोर शरिराची ढाल करून उभा राहिलेल्या हनुमा विहारी ( Hanuma Vihari)ची जीगरबाज खेळी सर्वांनी पाहिली. त्या कसोटीत वेगवान चेंडू शरिरावर झेलून त्याने भारताचा पराभव टाळला अन् १६१ चेंडूंत नाबाद २३ धावांची कौतुकास्पद खेळी केली. आज पुन्हा एकदा हनुमा विहारी ट्रेंडिंगमध्ये आहे आणि त्याला कारणही तसेच आहे. रणजी करंडक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात आंध्र प्रदेशचा कर्णधार हनुमा जेव्हा मैदानावर आला तेव्हा टाळ्यांचा कडकडाट अन् शिट्या वाजल्या. गतविजेत्या मध्य प्रदेशविरुद्घच्या या सामन्यात हनुमा उजव्या हाताने नाही, तर डाव्या हाताने फलंदाजी करताना दिसला.
मध्य प्रदेशविरुद्धच्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पहिल्याच दिवशी आवेश खानच्या गोलंदाजीवर हनुमाच्या उजव्या हाताला जबरदस्त दुखापत झाली. त्याला मनगटही हलवता येत नव्हते. पण, आज दुसऱ्या दिवशी संघ अडचणीत असताना हनुमा मोडलेल्या मनगटावर तात्पुरती बँडेज लावून मैदानावर फलंदाजीला आला अन् शिट्या वाजल्या. दिनेश कार्तिकनेही त्याचे ट्विट करून कौतुक केले. त्याने ५७ चेंडूंत २७ धावांचे महत्त्वाचे योगदान देताना संघाला ३७९ धावांपर्यंत पोहोचवले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"