Ranji Trophy Vidarbha vs Mumbai Semi Final 2 Suryakumar Yadav Duck : मुंबई विरुद्ध विदर्भ यांच्यातील दुसऱ्या उपांत्य सामना नागपूरच्या मैदानात खेळवण्यात येत आहे. घरच्या मैदानावर खेळणाऱ्या विदर्भ संघानं या सामन्यावर मजबूत पकड मिळवली आहे. पहिल्यांदा फलंदाजी करताना मोठी धावसंख्या उभारल्यानंतर मुंबईच्या संघाच्या पहिल्या डावाला विदर्भ संघातील गोलंदाजांनी खिंडार पाडले. स्टार खेळाडू स्वस्तात आटोपल्यामुळे दुसऱ्या दिवसाच्या खेळातील पहिल्याच डावात मुंबईचा संघ अडचणीत आला आहे. संघाला अडचणीत आणण्यात सूर्यकुमार यादव सर्वात आघाडीवर आहे. तो या सामन्यात आपलं खातंही उघडू शकला नाही.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सूर्यकुमार यादववर १० डावात पाचव्यांदा आली शून्यावर बाद होण्याची वेळ
भारतीय टी-२० संघाचे नेतृत्व करताना सूर्यकुमार आपल्या बॅटिंगची धमक दाखवण्यात कमी पडल्याचे समोर आले होते. देशांतर्गत सामन्यात दुसऱ्याच्या नेतृत्वाखाली खेळतानाही त्याला बॅटिंग जमेना झालीये. उपांत्यपूर्व फेरीत ७० धावांच्या खेळीसह त्याने पुन्हा कमबॅक केल्याचे संकेत दिले होते. पण त्यानंतर महत्त्वाच्या उपांत्य सामन्यात त्याने सपशेल नांगी टाकल्याचे पाहायला मिळाले. विदर्भ संघाच्या ताफ्यातील पार्थ रेखाडे याने दोन चेंडूत त्याचा खेळ खल्लास केला. एवढेच नाही त्याच्यानंतर शिवम दुबेलाही त्याने शून्यावर माघारी धाडले. सूर्यावर १० डावात ५ व्यांदा शून्यावर आउट होण्याची नामुष्की ओढावलीये.
संकटात सापडलाय मुंबईचा संघ
विदर्भ संघानं टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करताना ३८३ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना मुंबईची फलंदाजी कोलमडून पडली. विकेट किपर बॅटर आकाश आनंद याने संयमी खेळी करत १७१ चेंडूत केलेल्या ६७ धावांशिवाय एकाही मुंबईकराला मैदानात तग धरता आला नाही. दुसऱ्या डावाचा खेळ संपला त्यावेळी मुंबईच्या संघानं १८८ धावांत ७ विकेट गमावल्या होत्या. फक्त ३ विकेट्स शिल्लक असताना संघ १९५ धावांनी पिछाडीवर आहे.