Ranji Trophy 2024 ( Marathi News ) - मुंबईत संधी मिळत नसल्याने गोवा संघाकडून खेळणाऱ्या अर्जुन तेंडुलकरने ( Arjun Tendulkar) आज गुजरातला पाणी पाजले. अर्जुनच्या अष्टपैली खेळीच्या जोरावर गोवा संघाने फलंदाजीत मोठी धावसंख्या उभारली आणि त्यानंतर गुजरातला मोठी आघाडी घेण्यापासून रोखले. रणजी करंडक स्पर्धेत गोवा संघाच्या पहिल्या डावातील ३१७ धावांच्या प्रत्युत्तरात गुजरातचा संपूर्ण संघ ३४६ धावांत गडगडला.
प्रथम फलंदाजी करताना गोवा संघाची सुरुवात काही खास झाली नाही. अमोघ देसाई ( ४), सुयांश प्रभुदेसाई ( २८), मंथन खुटकर ( १९), सिद्धार्थ के व्ही ( १२), स्नेहल कौठणकर ( ३) व दीपराज गावकर ( ४) हे आघाडीचे ६ फलंदाज ७६ धावांवर तंबूत परतले होते. कर्णधार दर्शन मिसाळ व अर्जुन तेंडुलकर यांनी संघाचा डाव सावरला. मिसाळने ११० चेंडूंत १२ चौकार व १ षटकारांच्या मदतीने ८९ धावांची खेळी केली. अर्जुनने ७० चेंडूंत ८ चौकारांसह ४५ धावा केल्या. मोहित रेडकरनेही ९१ चेंडूंत ८ चौकार व ४ षटकारासह ८० धावा चोपल्या आणि संघाला ३१७ धावांपर्यंत पोहोचवले.
प्रत्युत्तरात गुजरातचा सलामीवीर पी के पांचाळने १७१ धावांची खेळी करून गोवाला चांगले झोडले. पण, दुसऱ्या बाजूने ए यू पटेल (१३), सनप्रीत बग्गा ( ०), हेत पटेल ( १८), उमंग ( ३७), एम हिंगराजीया ( १७), आर विश्नोई ( ३०) व कर्णधार सी टी गजा ( २) हे अपयशी ठरले. अर्जुनने गुजरातचा सलामवीर पांचाळसह ४ विकेट्स घेतल्या. त्याने २१-०३-४९-४ अशी स्पेल टाकली. दर्शन मिसाळने दोन विकेट्स घेतल्या आणि गुजरातचा पहिला डाव ३४६ धावांवर गडगडला. त्यांना फक्त २९ धावांची आघाडी घेता आली.