Mumbai vs Vidarbha । मुंबई: मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई आणि विदर्भ यांच्यात रणजी करंडक स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जात आहे. ५३ वर्षांनंतर प्रथमच एकाच राज्यातील दोन संघ अंतिम फेरीत आले आहेत. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना मुंबईने चांगली सुरूवात केली. पृथ्वी शॉने दमदार फलंदाजी केली पण मुंबईच्या मधल्या फळीतील फलदाजांनी निराशाजनक कामगिरी केली. विदर्भाने पुनरागमन करत पहिले सत्र आपल्या नावावर केले. पण, उपांत्य सामन्याप्रमाणे अंतिम फेरीतही शार्दुल ठाकूर चमकला.
मुंबईचा संघ अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात तर विदर्भ अक्षय वाडकरच्या नेतृत्वात मैदानात आहे. सर्व फलंदाज अपयशी होत असताना शार्दुलने स्फोटक खेळी केली. त्याने आपल्या खेळीत ३ षटकार आणि ८ चौकार लगावले. लॉर्ड शार्दुलने ६९ चेंडूत ७५ धावा करून संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवले. मुंबईचा संघ आपल्या पहिल्या डावात ६४.३ षटकांत सर्वबाद केवळ २२४ धावा करू शकला.
आपला संघ अडचणीत असताना शार्दुलने चांगली खेळी करत संघाला मजबूत स्थितीत पोहोचवले. विदर्भाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला आलेल्या मुंबईने शानदार सुरुवात केली. पण त्यानंतर विदर्भाने पुनरागमन करत पहिले सत्र आपल्या नावावर केले. मुंबईने ४४ षटकांपर्यंत ६ बाद १३२ धावा केल्या होत्या. पृथ्वी शॉ (४६), भूपेल लालवानी (३७), मुशीर खान (६), अजिंक्य रहाणे (७), श्रेयस अय्यर (७), हार्दिक तमोर (५), शम्स मुलानी (१३), तनुश कोटियन (८) आणि तुषार देशपांडे (१४) धावा करून बाद झाला. पण एकट्या शार्दुलने मोर्चा सांभाळला. विदर्भाकडून हर्ष दुबे आणि यश ठाकूर यांनी प्रत्येकी ३-३ बळी घेतले, तर उमेश यादव (२) आणि आदित्य ठाकरेने (१) बळी घेतला. मुंबईचे फलंदाज अपयशी ठरल्यामुळे विदर्भाला पहिल्याच दिवशी फलंदाजीची संधी मिळाली. दिवसअखेर त्यांनी १३ षटकांत ३ बाद १३१ धावा केल्या आहेत.
दरम्यान, मुंबई आणि विदर्भाने अंतिम फेरी गाठून विक्रम केला. रणजी करंडक स्पर्धेच्या इतिहासात तब्बल ५३ वर्षांनंतर असे घडले की, अंतिम फेरी गाठणारे दोन्ही संघ एकाच राज्यातील आहेत. आतापर्यंत रणजी करंडकमध्ये दोनदाच असा योगायोग जुळून आला आहे. अंतिम फेरी गाठणारे दोन्ही संघ एकाच राज्यातून आल्याची ही तिसरी वेळ आहे. १९७१ मध्ये प्रथमच महाराष्ट्र आणि मुंबईने अंतिम फेरी गाठली होती. तेव्हा मुंबईने अंतिम फेरीत शानदार विजयाची नोंद केली होती. आता पुन्हा एकदा एकाच राज्यातील दोन्ही संघ अंतिम फेरीत पोहोचले आहेत. विदर्भ आणि मुंबईच्या संघाला इतिहासात नाव नोंदवण्याची संधी आहे.