Ranji Trophy 2024 : गुजरात संघाने रणजी करंडक स्पर्धेत सोमवारी ऐतिहासिक विजयाची नोंद केली. कर्नाटक विरुद्धच्या सामन्यात १०९ धावांचा बचाव करण्यात गुजरातला यश आलं. कर्नाटनके ५० धावांवर एकही विकेट गमावली नव्हती, परंतु सिद्धार्थ देसाईच्या फिरकीसमोर त्यांनी गुडघे टेकले. सिद्धार्थने ४२ धावांत ७ विकेट्स घेतल्या आणि बिनबाद ५० वरून कर्नाटकचा संपूर्ण संघ १०३ धावांत तंबूत परतला. ५३ धावांत त्यांच्या १० विकेट्स पाडून गुजरातने ६ धावांनी रोमहर्षक विजयाची नोंद केली.
क्षितिज पटेल ( ९५), उमंग ( ७२) व कर्णधार सी गाजा ( ४५*) यांच्या खेळीच्या जोरावर गुजरातने पहिल्या डावात ३७४ धावा केल्या. प्रत्युत्तरात कर्नाटकला पहिल्या डावात २६४ धावाच करता आल्या. कर्णधार मयांक अग्रवालने १०९ धावांची खेळी करूनही कर्नाटकचा डाव गडगडला. गुजरातचा दुसरा डाव २१९ धावांत गुंडाळून कर्नाटकने विजयाचा पाया रचला होता. गुजरातच्या एम हिंगराजीया ( ५६) व उमंग ( ५७) यांनी अर्धशतकी खेळी करून कर्नाटकसमोर विजयासाठी ११० धावांचे लक्ष्य ठेवले.
मयांक अग्रवाल ( १९) व देवदत्त पडिक्कल ( ३१) यांनी सुरुवात चांगली केली होती आणि ९.२ षटकापर्यंत फलकावर ५० धावा चढवल्या होत्या. पण, देसाईने कर्नाटकला पहिला धक्का देताना मयांकला माघारी पाठवले. त्यानंतर देवदत्तचीही त्याने विकेट घेतली आणि कर्नाटकची पडझड सुरू झाली. शुभंग हेगडे ( २७) वगळल्यास कर्नाटकच्या एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या करता आली नाही. कर्नाटकचा संपूर्ण संघ २६.२ षटकांत १०३ धावांत गडगडला. सिद्धार्थ देसाईने १३-४-४२-७ अशी अप्रतिम स्पेल टाकली.
Web Title: Ranji Trophy 2024 : 𝗛𝗜𝗦𝗧𝗢𝗥𝗜𝗖 𝗪𝗜𝗡 𝗙𝗢𝗥 𝗚𝗨𝗝𝗔𝗥𝗔𝗧! Karnataka were 50/0 ( Chasing 110) And then, Gujarat's 𝗦𝗶𝗱𝗱𝗵𝗮𝗿𝘁𝗵 𝗗𝗲𝘀𝗮𝗶 𝗷𝘂𝘀𝘁 𝗱𝗿𝗼𝗽𝗽𝗲𝗱 𝘁𝗵𝗲 𝗺𝗮𝘀𝘁𝗲𝗿𝗰𝗹𝗮𝘀𝘀 7/42, Gujarat won by 6 runs.
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.