Join us  

मुंबईची पोरं हुशार ! तनुष कोटियन, तुषार देशपांडे यांचे शतक; १९४६ नंतर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पराक्रम

मुंबई विरुद्ध बडोदा लढतीत हा विक्रम झाला आणि गोलंदाजांनी फलंदाजीत भीमपराक्रम करून दाखवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 11:58 AM

Open in App

Ranji Trophy 2024 Mumbai vs Baroda ( Marathi News ) - मुंबईच्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये मंगळवारी ऐतिहासिक खेळी पाहायला मिळाली.. मुंबई विरुद्ध बडोदा लढतीत हा विक्रम झाला आणि गोलंदाजांनी फलंदाजीत भीमपराक्रम करून दाखवला. मुंबईकडून खेळणाऱ्या तनुष कोटियन व तुषार देशपांडे यांनी १०व्या व ११ व्या क्रमांकावर फलंदाजी करताना वैयक्तिक शतक झळकावलं आणि २३२ धावांची विक्रमी भागीदारी केली. पण, केवळ १ धावेने रणजी करंडक स्पर्धेतील सर्वकालीन विक्रम मोडण्यापासून ते चुकले. मुंबईने दुसऱ्या डावात ५६९ धावांचा डोंगर उभा करून बडोदासमोर ६०५ धावांचे आव्हान उभे केले.

मुंबई इंडियन्सच्या पहिल्या डावातील ३८४ धावांच्या प्रत्युत्तरात बरोडा पहिल्या डावात आघाडी घेण्याच्या दिशेने कूच करत होता, परंतु शाम्स मुन्सी ( ४-१२१) व तनुष कोटियन ( २-४९) यांनी त्यांना ३४८ धावांवर गुंडाळले. मुंबईचा सलामीवीर हार्दिक तामोरेने ११४ धावांची खेळी करताना मुंबईला सावरले होते, परंतु मधळी फळी अपयशी ठरली. मुशीर खान ( ३३),  पृथ्वी शॉ ( ८७), शाम्स मुलानी ( ५४) यांनी चांगले योगदान दिले, परंतु मुंबईचा डाव गडगडला. कर्णधार अजिंक्य रहाणे पुन्हा एकदा अपयशी ठरला. पण, कोटियन व तुषार देशपांडे उभे राहिले.

तनुष व तुषार यांनी ९ बाद ३३७ धावांवरून संघाला ५६९ धावांपर्यंत पोहोचवले. तुषारने १२९ चेंडूंत १० चौकार व ८ षटकारांच्या मदतीने १२३ धावा केल्या आणि रणजी करंडक स्पर्धेत ११व्या क्रमांकावरील ही सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी ठरली. २००१ मध्ये तामिळनाडूच्या वी शिवारामाकृष्णन यांनी दिल्लीविरुद्ध ११५ धावा केल्या होत्या आणि तुषारने हा विक्रम मोडला. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १०व्या विकेटसाठी २०० हून अधिक धावांची भागीदारी करणारी तनुष व तुषार ही तिसरी भारतीय जोडी ठरली. तनुषनेही १२९ चेंडूंत १० चौकार व ४ षटकारांच्या मदतीने नाबाद १२० धावा केल्या.

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १० व ११ व्या क्रमांकावरील फलंदाजांनी एकाच डावात शतक झळकावण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी १९४६ साली इंडियन्स विरुद्ध सरे या लढतीत चंदू सर्वते ( १२४*) व शुते बॅनर्जी ( १२१) यांनी हा विक्रम केला होता. ७८ वर्षानंतर असा पराक्रम घडला.  

टॅग्स :रणजी करंडकमुंबई