Shardul Thakur Ranji Trophy 2024 । मुंबई: शार्दुल ठाकूर गेल्या अनेक दिवसांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. पण देशांतर्गत सामन्यांमध्ये तो चमकदार कामगिरी करत आहे. शार्दुलने रणजी ट्रॉफी २०२३-२४ च्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात शतक झळकावले. मुंबईचा संघ अडचणीत असताना त्याने १३ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने १०९ धावा केल्या. शार्दुलच्या या खेळीच्या जोरावर मुंबईने पहिल्या डावात ३०० धावांचा टप्पा पार केला. चांगली फलंदाजी करण्यापूर्वी शार्दुलने गोलंदाजीतही कमाल केली होती. त्याने १४ षटकात २ बळी घेतले.
रणजी ट्रॉफीमध्ये शनिवारपासून मुंबई आणि तामिळनाडू यांच्यात उपांत्य सामना खेळवला जात आहे. अंतिम फेरीचे तिकिट मिळवण्यासाठी दोन्हीही संघ मैदानात आहे. टीम इंडियातून बाहेर पडल्यानंतर मुंबईकर श्रेयस अय्यर आपल्या संघासोबत जोडला गेला आहे. मात्र, अय्यरला काही साजेशी कामगिरी करता आला नाही. संघ अडचणीत असताना शार्दुलने अप्रतिम खेळी करत शतक पूर्ण केले. शार्दुलच्या शतकानंतर त्याने जोरदार सेलिब्रेशन केले. कर्णधार अजिंक्य रहाणेने देखील शार्दुलच्या खेळीला दाद देत सलाम ठोकला.
कर्णधार अजिंक्य रहाणे मुंबईसाठी विशेष काही करू शकला नाही. ६७ चेंडूत १९ धावा करून तो बाद झाला. रहाणेने २ चौकार मारले. मुशीर खानने अर्धशतक झळकावले. त्याने १३१ चेंडूंचा सामना करत ५५ धावा केल्या. मुशीरच्या या खेळीत ६ चौकारांचा समावेश होता. यष्टिरक्षक फलंदाज हार्दिक तमोरेने ९२ चेंडूत ३५ धावा केल्या.
दरम्यान, अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वातील मुंबईने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम गोलंदाजी करताना पाहुण्या तामिळनाडू संघाला अवघ्या १४६ धावांत रोखले. मुंबईकडून तुषार देशपांडेने सर्वाधिक (३) बळी घेतले, तर शार्दुल ठाकूर (२), मुशीर खान (२), तनुश कोटियन (२) आणि मोहित अवस्थीला (१) बळी घेण्यात यश आले. पाहुणा संघ ६४.१ षटकांत अवघ्या १४६ धावांवर सर्वबाद झाला. तामिळनाडूचा संघ पहिल्या डावात स्वस्तात तंबूत परतल्यानंतर मोठी धावसंख्या उभारण्याची सुवर्णसंधी मुंबईच्या संघाकडे होती. मात्र, यजमानांना देखील साजेशी कामगिरी करता आली नाही. पण शार्दुल ठाकूरची शतकी खेळी याला अपवाद ठरली.