शार्दूल ठाकूरने ( Shardul Thakur) पुनरागमनाच्या सामन्यात वेगवान गोलंदाजीने प्रतिस्पर्धींना गुडघे टेकण्यास भाग पाडले. Ranji Trophy च्या लढतीत मुंबईचे प्रतिनिधित्व करताना शार्दूलने १० षटकांत २१ धावा देताना ६ विकेट्स घेतल्या आणि प्रतिस्पर्धी आसामचा पहिला डाव लंच ब्रेकच्या आधी ८४ धावांवर गुंडाळला. दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर शार्दूल क्रिकेटच्या मैदानापासून दूर होता आणि इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी त्याचा नावाचा विचार केला गेला नाही. पण, रणजी करंडक स्पर्धेतून आज त्याने पुनरागमन केले आणि पहिल्याच सामन्यात ६ विकेट्स घेतल्या.
आसामच्या परवेज मुसरफला शार्दूलने चौथ्या षटकात २ धावांवर त्रिफळाचीत केले. त्यानंतर मोहित अवस्थीने दुसरा सलामीवीर राहुल हजारिकाला बाद केले. शाम्स मुलानीने दोन धक्के देताना आसामचा डाव पोखरून टाकला. त्यानंतर शार्दूलने एकमागून एक धक्के दिले. त्याने एस सी घाडीगावकर ( ४), कर्णधार देनिश दास ( ५), कुणाल शर्मा ( १), सचिन लचित ( २) व दिबाकर जोहोरी ( ०) यांना माघारी पाठवले. तुषार देशपांडेने एक विकेट घेतली. आसामचा संपूर्ण संघ ३२.१ षटकांत ८४ धावांत तंबूत परतला.
शार्दूलने भारताकडून ११ कसोटीत ३१ विकेट्स घेतल्या आहेत. ४७ वन डे सामन्यांत त्याच्या नावावर ६५ आणि २५ ट्वेंटी-२०मध्ये ३३ विकेट्स आहेत.