रणजी चषक क्रिकेट अंतिम सामना: गोलंदाजांनी गाजवला पहिला दिवस; शार्दूल ठाकूरचे झुंजार अर्धशतक

विदर्भाने मुंबईला २२४ धावांत गुंडाळले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2024 10:15 AM2024-03-11T10:15:25+5:302024-03-11T10:16:25+5:30

whatsapp join usJoin us
ranji trophy cricket final 2024 bowlers dominate day one shardul thakur fighting half century | रणजी चषक क्रिकेट अंतिम सामना: गोलंदाजांनी गाजवला पहिला दिवस; शार्दूल ठाकूरचे झुंजार अर्धशतक

रणजी चषक क्रिकेट अंतिम सामना: गोलंदाजांनी गाजवला पहिला दिवस; शार्दूल ठाकूरचे झुंजार अर्धशतक

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

रोहित नाईक, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : विदर्भाने रणजी चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात यजमान मुंबईचा पहिला डाव ६४.३ षटकांत २२४ धावांत गुंडाळला. यानंतर मुंबईकरांनीही चांगले पुनरागमन करत पहिल्या दिवसाअखेर विदर्भ संघाची १३ षटकांत ३ बाद ३१ धावा अशी अवस्था करत पुनरागमन केले. अष्टपैलू शार्दूल ठाकूरने शानदार अर्धशतकी खेळी केल्याने मुंबईला द्विशतकी मजल मारता आली.

पहिल्याच दिवशी एकूण १३ फलंदाज बाद झाल्याने गोलंदाजांचे वर्चस्व दिसून आले. वानखेडे स्टेडियमवर नाणेफेक जिंकून विदर्भाने यजमानांना फलंदाजीस निमंत्रित केले. मुंबईकरांनी दमदार सुरुवात करून विदर्भाचा निर्णय चुकीचा ठरविण्याचा प्रयत्न केला. पृथ्वी शॉ आणि भूपेन लालवानी यांनी १२० चेंडूंत ८१ धावांची सलामी दिली; परंतु, यश ठाकूरने भूपेनला बाद करून ही जोडी फोडल्यानंतर ठरावीक अंतराने मुंबईने बळी गमावले. भूपेनने ६४ चेंडूंत ४ चौकारांसह ३७ धावा केल्या. पृथ्वी ६३ चेंडूंत ५ चौकारांसह ४६ धावा करून बाद झाला. पुन्हा एकदा तो चांगल्या सुरुवातीनंतर परतला. 

यानंतर मुंबईची मधली फळी कोसळली आणि संघाची ६ बाद १११ धावा अशी अवस्था झाली. श्रेयस अय्यर (७) आणि कर्णधार अजिंक्य रहाणे (७) यांनी मोठी निराशा केली. येथून संघाला सावरले ते लॉर्ड शार्दूलने. शार्दूलने बॅझबॉल क्रिकेट खेळताना विदर्भाच्या गोलंदाजांवर हल्ला चढवत ६९ चेंडूंत ८ चौकार व ३ षटकारांसह ७५ धावा केल्या. त्याने शम्स मुलाणीसोबत (१३) सातव्या गड्यासाठी ४३ धावांची भागीदारी केली. 

यानंतर शार्दूलने तनुष कोटियनसोबत २२ धावांची, तर तुषार देशपांडेसह ४२ धावांची भागीदारी करत मुंबईला २०० धावांचा पल्ला पार करून दिला. शार्दूल हा बाद होणारा अखेरचा मुंबईकर ठरला. हर्ष दुबे आणि यश ठाकूर यांनी प्रत्येकी ३ बळी घेत मुंबईला हादरे दिले. यानंतर विदर्भाची सुरुवातही अडखळती झाली. शार्दूलने गोलंदाजीतही छाप पाडताना तिसऱ्याच षटकात ध्रुव शोरी (०) याला पायचित केले.

तसेच, अखेरचा प्रथम श्रेणी सामना खेळत असलेल्या धवल कुलकर्णीने अमन मोखाडे (८) आणि धोकादायक करुण नायर (०) यांना बाद करून मुंबईला पुनरागमन करून दिले. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा सलामीवीर अथर्व तायडे (२१*) आणि आदित्य ठाकरे (०*) खेळपट्टीवर नाबाद होते. 

दर्दींची गर्दी

रणजी चषक सामन्यांसाठी स्टेडियममध्ये असलेला विनामूल्य प्रवेश आणि रविवारचा सुट्टीचा दिवस, असा योग जुळून आल्याने क्रिकेटप्रेमी दर्दी रसिकांनी वानखेडे स्टेडियममध्ये चांगली गर्दी केली होती. यावेळी एमसीएने सर्व प्रेक्षकांसाठी विजय मर्चंट स्टँड खुला केला होता. तरुणांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली असली, तरी चिमुकल्यांची उपस्थितीही लक्षवेधी ठरली. 

धवलला मिळाला गार्ड ऑफ ऑनर 

वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णी आपल्या कारकिर्दीतील अखेरचा प्रथम श्रेणी सामना खेळत आहे. यामुळे क्षेत्ररक्षणासाठी मैदानावर जाताना मुंबई संघाच्या खेळाडूंनी दोन्ही बाजूंना उभे राहत आपल्या अनुभवी वेगवान गोलंदाजाला गार्ड ऑफ ऑनर दिला. धवल रणजी स्पर्धेत सहाव्यांदा अंतिम सामन्यात खेळत असून, प्रथम श्रेणी क्रिकेटमधील हे त्याचे १७वे मोसम आहे.

वानखेडे स्टेडियम झाले ५० वर्षांचे

ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमला ५० वर्षे झाल्याच्या निमित्ताने मुंबई क्रिकेट संघटनेच्या वतीने (एमसीए) रणजी चषक अंतिम सामन्याला सुरुवात होण्याआधी मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणे आणि विदर्भ संघांचा कर्णधार अक्षय वाडकर यांना विशेष मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे, एमसीएने वानखेडे स्टेडियमवर खेळलेल्या मुंबईच्या पहिल्या संघाचे सदस्य माजी क्रिकेटपटू मिलिंद रेगे आणि १९७४ सालापासून एमसीएच्या सेवेत असलेल्या सी. एस. नाईक यांच्यासह अंतिम सामन्याचे पंच आणि सामनाधिकारी यांनाही सन्मानचिन्ह देऊन गौरविले.

धावफलक

 मुंबई (पहिला डाव) : पृथ्वी शॉ त्रि. गो. दुबे ४६, भूपेन लालवानी झे. वाडकर गो. यश ३७, मुशीर खान पायचित गो. दुबे ६, अजिंक्य रहाणे झे. शोरी गो. दुबे ७, श्रेयस अय्यर झे. नायर गो. यादव ७, हार्दिक तामोरे झे. वाडकर गो. ठाकरे ५, शम्स मुलाणी पायचित गो. यश १३, शार्दूल ठाकूर झे. दुबे गो. यादव ७५, तनुष कोटियन झे. वाडकर गो. यश ८, तुषार देशपांडे धावबाद (यादव) १४, धवल कुलकर्णी नाबाद ०. अवांतर - ६. एकूण : ६४.३ षटकांत सर्वबाद २२४ धावा.

बाद क्रम : १-८१, २-८९, ३-९२, ४-९९, ५-१११, ६-१११, ७-१५४, ८-१७६, ९-२१८, १०-२२४.

गोलंदाजी : उमेश यादव १३.३-२-४३-२; आदित्य ठाकरे १६-६-३६-१; हर्ष दुबे २०-३-६२-३; यश ठाकूर ११-२-५४-३; आदित्य सरवटे ४-०-२५-०.

 विदर्भ (पहिला डाव) : अथर्व तायडे खेळत आहे २१, ध्रुव शोरी पायचित गो. शार्दूल ०, अमन मोखाडे झे. हार्दिक गो. धवल ८, करुण नायर झे. हार्दिक गो. धवल ०, आदित्य ठाकरे खेळत आहे ०. अवांतर - २. एकूण : १३ षटकांत ३ बाद ३१ धावा.
बाद क्रम : १-१, २-२०, ३-२४.

गोलंदाजी : शार्दूल ठाकूर ५-०-१४-१; धवल कुलकर्णी ६-२-९-२; तुषार देशपांडे २-०-८-०.

 

Web Title: ranji trophy cricket final 2024 bowlers dominate day one shardul thakur fighting half century

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.