भारतीय संघ बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. नोव्हेंबर पासून सुरु होणाऱ्या या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआयनं आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी मालिकेसाठी १८ सदस्यीय संघात ३ नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. अभिमन्यू ईश्वरनसह नितिश कुमार रेड्डी आणि हर्षित राणा या तिघांनी अद्याप एकही कसोटी सामना खेळलेला नाही. हर्षित राणानं टीम इंडियात एन्ट्री मिळाल्याचं अगदी खास अंदाजात सेलिब्रेशन केल्याचे पाहायला मिळाले. सध्या तो रणजी करंडक स्पर्धेत खेळत असून मैदानात अष्टपैलू खेळीचा नजराणा त्याने पेश केला आहे. हर्षित राणाची कमाल, एकट्यानं अर्धा संघ धाडला तंबूत
उजव्या हाताने मध्यम जलदगती गोलंदाजीसह उजव्या हाताने फलंदाजी करणारा हर्षित राणा हा दिल्लीच्या संघाचे प्रतिनिधीत्व करतो. आसाम विरुद्धच्या सामन्यात त्यानं गोलंदाजी आणि फलंदाजीतील आपली ताकद दाखवून दिली. आसाम विरुद्धच्या सामन्यातील पहिल्या डावात गोलंदाजी करताना त्याने पाच विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या. १९.३ षटकात ७० धावा खर्च करून त्याने निम्मा संघ तंबूत धाडला. यात आघाडीच्या दोघांना तर त्याने खेतही उघडू दिले नाही.
संघ अडचणीत असताना करून दाखवली दमदार फलंदाजी
आसामच्या संघाने पहिल्या डावात ३३० धावा केल्यावर दिल्लीच्या संघाची सुरुवात खराब झाली. १८२ धावांवर ६ विकेट्स गमावल्या असताना हर्षित राणा मैदानात उतरला. संघ संकटात असताना त्याने सुमित माथुरच्या साथीनं संघाचा डाव सावरला. हर्षितनं ७८ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ५९ धावांची उपयुक्त खेळी केली. शतकी खेळी करणाऱ्या सुमितच्या साथीनं त्याने ९९ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. त्यामुळेच दिल्लीचा संघ ४५४ धावांपर्यंत मजल मारू शकला.
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये हर्षितच्या नावे एका शतकाचीही नोंद
हर्षित राणानं आतापर्यंत ९ प्रथम श्रेणी सामने खेळला आहे. यात त्याने ३६ विकेट्स घेतल्या आहेत. १०८ धावा खर्च करून १० विकेट्स ही त्याची प्रथम श्रेणी क्रिकेटमधील गोलंदाजीतील सर्वोत्तम कामगिरी आहे. फलंदाजीत त्याने ४१ च्या सरासरीनं ४१० धावा काढल्या असून १२२ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. त्यामुळेच ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमधील तो एक प्रबळ दावेदार मानला जात आहे.