गुवाहाटी : भारताच्या १९ वर्षाखालील विश्वविजेत्या संघाचा कर्णधार यश धूलने रणजी पदापर्णाच्या सामन्यात दोन्ही डावात शतक ठोकण्याचा पराक्रम केला; मात्र तरीही तामिळनाडूविरुद्धच्या सामन्यात दिल्लीला विजय मिळवून देण्यात तो अपयशी ठरला. अनिर्णित राहिलेल्या या सामन्यात तामिळनाडूने पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर तीन गुणांची कमाई केली. तर दिल्लीला एका गुणावर समाधान मानावे लागले. पहिल्या डावात ललित यादव (१७७) धूलच्या (११३) शतकी खेळीच्या जोरावर दिल्लीने ४५२ धावांचा डोंगर उभारला होता.
प्रत्युत्तरादाखल तामिळनाडूने शाहरुख खानच्या आक्रमक १९४ धावांच्या झंझावाती खेळीमुळे ४९४ धावा करत ४२ धावांची बहुमूल्य आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या डावात दिल्लीने यश धूल (नाबाद ११३) आणि ध्रुव शोरी (नाबाद १०७) यांच्या शतकी खेळीमुळे ६०.५ षटकांत बिनबाद २२८ धावा केल्या.
या सामन्याचे आकर्षण ठरले ते १९ वर्षीय यश धूलच्या दोन्ही डावातील शतकी खेळी. पहिल्या डावात ११३ धावांची खेळी करणाऱ्या धूलने दुसऱ्या डावातही ११३ धावांचीच खेळी केली; मात्र यावेळेस तो नाबाद होता.
अशी कामगिरी करणारा तिसराच
रणजी पदार्पणाच्या सामन्यात असा पराक्रम करणारा तो तिसरा क्रिकेटर ठरला. याआधी नरी कॉन्ट्रॅक्टर यांनी गुजरातकडून खेळताना आणि विराट स्वाठे यांनी महाराष्ट्र संघाकडून खेळताना रणजी पदार्पणाच्या दोन्ही डावात शतक ठोकले होते.
दिल्ली (पहिला डाव) : १४१.२ षटकांत सर्वबाद ४५२ (ललीत यादव १७७, यश धूल ११३, एम. मोहम्मद ४/७५).
तामिळनाडू (पहिला डाव) : १०७.५ षटकांत सर्वबाद ४९४ (शाहरुख खान १९४, बाबा इंद्रजीत ११७, विकास शर्मा ६/१०८).
दिल्ली (दुसरा डाव) : ६०.५ षटकांत बिनबाद २२८ (यश धूल ११३, ध्रुव शोरी १०७).
Web Title: Ranji Trophy Delhis Yash Dhull scores centuries in both innings of his first class debut
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.