बंगळुरु : भारताच्या ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक कसोटी मालिका विजयाचा नायक चेतेश्वर पुजारा मायदेशात 'चीटर' ठरला. कर्नाटक आणि सौराष्ट्र यांच्यातील रणजी करंडक स्पर्धेतील उपांत्य फेरीचा सामन्यातील ही घटना. सौराष्ट्रने 5 विकेट राखून हा सामना जिंकला, परंतु एका कृत्यामुळे पुजारा चाहत्यांच्या मनातून उतरला. कर्नाटकचा गोलंदाज विनय कुमारच्या गोलंदाजीवर डिफेन्स करण्याचा पुजाराचा प्रयत्न फसला. तो चेंडू पुजाराच्या बॅटचे चुंबन घेऊन यष्टिरक्षकाच्या ग्लोजमध्ये विसावला होता. त्यामुळे विनय कुमारसह कर्नाटकच्या सर्व खेळाडूंनी आऊटचे अपील केले. पंचांनी त्याला नाबाद ठरवले. मात्र, रिप्लेत तो चेंडू पुजाराच्या बॅटला लागल्याचे दिसले. जेव्हा पुजारा पेव्हेलियनमध्ये परत जात होता तेव्हा चाहत्यांनी त्याला चीटर, चीटर असा टोमणा मारत होते.
पंच सय्यद खालिद यांच्या चुकीचा पुजाराला फायदा झाला. चेतेश्वर पुजाराच्या नाबाद 131 धावांच्या जोरावर सौराष्ट्रने अंतिम फेरीत प्रवेश केला. कर्नाटकने विजयासाठी ठेवलेले 279 धावांचे लक्ष्य सौराष्ट्रने सहज पार केले. अंतिम फेरीत त्यांच्यासमोर गतविजेत्या विदर्भ संघाचे आव्हान आहे. सौराष्ट्रच्या विजयात शेल्डन जॅक्सनच्या 100 धावाही महत्त्वाच्या ठरल्या. तीन वर्षांनंतर सौराष्ट्रने रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. यापूर्वी त्यांनी 2012-13 व 2015-16 च्या हंगामात अंतिम फेरी गाठली होती.