रोहित नाईक, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : बलाढ्य मुंबईने ४२व्यांदा रणजी चषक पटकावण्याच्या दिशेने भक्कम पाऊल टाकताना विदर्भ संघाविरुद्ध सोमवारी एकूण २६० धावांची भलीमोठी आघाडी घेतली. पहिल्या डावात २२४ धावा केल्यानंतर मुंबईने विदर्भाचा पहिला डाव १०५ धावांत गुंडाळून ११९ धावांची आघाडी घेतली, यानंतर दुसऱ्या दिवसअखेर मुंबईने ५० षटकांत २ बाद १४१ धावा करत सामन्यावर मजबूत पकड मिळवली.
कर्णधार अजिंक्य रहाणे आणि मुशीर खान यांनी नाबाद अर्धशतक झळकावत मुंबईची स्थिती भक्कम केली. दुसन्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा रहाणे १०९ चेंडूत ४ चौकार व एका षटकारासह नाबाद ५८, तर मुशीर १३५ चेंडूंत ३ चौकारांसह नाबाद ५१ धावांवर खेळत होता. यश ठाकूर आणि हर्ष दुबे यांनी प्रत्येकी एक बळी घेत मुंबईला सुरुवातीला धक्के दिले. मात्र, त्यानंतर मुशीर-रहाणे यांनी सावध पवित्रा घेत खेळपट्टीवर स्थिरावण्यास प्राधान्य दिले. दोघांनी जम बसताच काही अप्रतिम फटके खेळत मुंबईच्या धावगतीला वेग दिला. दोघांनी तिसऱ्या गड्यासाठी २३२ चेंडूंत नाबाद १०७ धावांची भागीदारी करत विदर्भाच्या गोलंदाजांचा घामटा काढला.
त्याआधी, दुसऱ्या दिवसाच्या पहिल्याच सत्रात मुंबईकरांनी सात बळी घेत विदर्भाचा डाव संपुष्टात आणला. धवल कुलकर्णी, शम्स मुलानी आणि तनुष कोटियन यांनी प्रत्येकी तीन बळी घेत विदर्भाच्या फलंदाजीला जबर हादरे दिले. खेळपट्टीवर धूळ उडू लागल्यानंतर ती संथ झाली आणि त्याचा फायदा घेत मुलानी-कोटियन या फिरकीपटूंनी विदर्भाच्या फलंदाजांना आपल्या तालावर नाचवले. उपाहाराच्या सहा मिनिटेआधी मुंबईने विदर्भाचा डाव गुंडाळला. विदर्भाच्या डावात एकही ५० हून अधिक धावांची भागीदारी झाली नाही. मुंबईकरांनी विदर्भाच्या फलंदाजांना फार वेळ टिकूच दिले नाही. यश राठोड याने विदर्भाकडून सर्वाधिक धावा काढताना ६७ चेंडूंत ३ चौकारांसह २७ धावा केल्या, तळाच्या फळीत यश ठाकूरने २९ चेंडूत ३ चौकारांसह १६ धावांची झुंज दिल्यानेविदर्भाला शतकी मजल मारता आली
रहाणेला गवसला सूर
यंदाच्या रणजी मोसमात अंतिम सामन्यापूर्वी केवळ एक अर्धशतक झळकावलेल्या अजिक्य रहाणेने मोक्याच्या वेळी फॉर्म मिळवला, पहिल्या डावात केवळ ७ धावा केलेल्या रहाणेने दुसऱ्या डावात नाबाद ५८ धावांची मोलाची खेळी केली. रहाणेने यंदा छत्तीसगडविरुद्ध नाबाद ५६ धावाची सर्वोच्च खेळी केली होती. विशेष म्हणजे त्याने यंदाची दोन्ही अर्धशतके दुसऱ्या डावात झळकावली. रहाणेने २३ डावांमध्ये केवळ दुसऱ्यांदा ५०हून अधिक धावा केल्या, त्याने यंदाच्या मोसमात आतापर्यंत एकूण १९९ धावा केल्या आहेत.
सरवटेने सोडले मैदान
विदर्भाचा प्रमुख फिरकीपटू आदित्य सरवटेने दुसऱ्या डावात ७ षटके मारा केल्यानंतर मैदान सोडले. यामुळे विदर्भाची गोलंदाजी काहीशी कमजोर झाली. पाठीत चमक भरल्याने त्याने मैदान सोडले. परंतु, सध्या त्याची स्थिती उत्तम असल्याचे विदर्भाचा वेगवान गोलंदाज यश ठाकूरने सांगितले. त्यामुळे मंगळवारी तो गोलंदाजी करताना दिसण्याची शक्यता आहे.
धावफलक
मुंबई (पहिला डाव) : ६४.३ षटकांत सर्वबाद २२४ धावा.
विदर्भ (पहिला डाव): अथर्व तायडे झे. हार्दिक गो. धवल २३. ध्रुव शोरी पायचित गो. शार्दूल ०, अमन मोखाडे झो. हार्दिक गो, धवल ८. करुण नायर झे. हार्दिक गो, धवल ०, आदित्य ठाकरे पायचित गो. मुलानी १९, यश राठोड ब्रि.गो. कोटियन २७, अक्षय वाडकर हो. हार्दिक गो. मुलानी ५. हर्ष दुबे झे. लालवानी गो. मुलानी १, यश ठाकूर झे. तुषार गो. कोटियन १६, उमेश यादव झे. तुषार गो. कोटियन २, आदित्य सरवटे नाबाद ०. अवांतर ४. एकूण: ४५.३ षटकांत सर्वबाद १०५ धावा, बाद क्रम : १-१, २-२०, ३- २४, ४-३९, ५-७९, ६-८५, ७-८७, ८-१७, १-१०४, १०-१०५
गोलंदाजी : शार्दूल ठाकूर ९-०-२२-१: धवल कुलकर्णी ११-५- १५-३, तुषार देशपांडे ९-०-२९-०; शम्स मुलानी १२-०-३२-३; तनुष कोटियन ४.३-१-७-३.
मुंबई (दुसरा डाव): पृथ्वी शॉ त्रि. गो. यश ठाकूर ११, भूपेन लालवानी झे. काळे गो. दुबे १८. मुशीर खान खेळत आहे ५१, अजिंक्य रहाणे खेळत आहे ५८. अवांतर ३. एकूण: ५० षटकांत २ बाद १४१ धावा, बाद क्रम : १-२६, २-३४, गोलंदाजी : यश ठाकूर १०-२-२५-१: हर्ष दुबे १७-२-४६-१; उमेश यादव ९-१-१७-०; आदित्य ठाकरे ६-२-११-०, आदित्य सरवटे ७-०- ३५-०; करुण नायर १-०-४-०,