देशांतर्गत क्रिकेटमधील प्रतिष्ठेची असलेल्या रणजी करंडक स्पर्धेतील अंतिम सामन्यात विदर्भ आणि केरळा यांच्यात रंगत पाहायला मिळणार आहे. अंतिम सामना नागपूर येथील विदर्भ क्रिकेट स्टेडियमवर रंगणार असल्यामुळे विदर्भ क्रिकेट संघासाठी ही जमेची बाजू ठरू शकते. दुसरीकडे पहिल्यांदा फायनल गाठणारा संघ नवा इतिहास रचण्याच्या इराद्याने मैदानात उतरले. इथं जाणून घेऊयात विदर्भ आणि केरळ यांच्यात रंगणारी फायनलची लढत कधी, कुठं अन् कशी पाहता येईल? यासंदर्भातील सविस्तर...
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
केरळचा संघ पहिल्यांदाच फायनल खेळणार
केरळचा संघ पहिल्यांदाच फायनलमध्ये पोहचला असून त्यांच्यासमोर दोन वेळच्या रणजी चॅम्पियन विदर्भ संघाचे मोठे आव्हान असेल. केरळच्या संघानं गुजरात विरुद्धच्या सेमी फायनल लढतीतील २ धावांच्या अल्प आघाडीच्या जोरावर ऐतिहासिक कामगिरीसह फायनलमध्ये धडक मारलीये. दुसरीकडे विदर्भच्या संघानं जिथं फानयल रंगणार आहे तिथेच गत चॅम्पियन मुंबईला शह देत पुन्हा एकदा जेतेपदासाठी दावेदारी ठोकलीये.
विदर्भ संघाची रणजी स्पर्धेतील कामगिरी
विदर्भच्या संघानं चौथ्यांदा रणजी करंडक स्पर्धेच्या फायलपर्यंत मजल मारली आहे. याआधी विदर्भ संघानं २०१७-१८ आणि २०१८-१९ या दोन हंगामात सलग जेतेपद पटकावले होते. गत हंगामातही विदर्भचा संघ फायनलमध्ये दिसला होता. पण त्यावेळी त्यांना मुंबईच्या संघासमोर पराभवाचा सामना करावा लागला होता. हॅटट्रिक हुकल्यावर विदर्भ संघ तिसऱ्यांदा जेतेपद पटकवण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.
कधी अन् कुठं पाहता येईल हा सामना?
रणजी करंडक स्पर्धेतील विदर्भ विरुद्ध केरळ यांच्यातील अंतिम सामना २६ फेब्रुवारी ते २ मार्च या कालावधीत विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहे. सकाळी ९ वाजून ३० मिनिटांनी या सामन्याला सुरुवात होईल. देशांतर्गत क्रिकेटमधील मेगा फायनलचा जिओ हॉटस्टार अॅप आणि वेबसाईटवर आनंद घेता येईल.