रणजी ट्रॉफी फायनल : बंगालने सौराष्ट्राला रोखले

सौराष्ट्रच्या पाच बाद २०६ धावा, वेगवान गोलंदाज आकाश दीपचे ३ बळी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2020 03:27 AM2020-03-10T03:27:22+5:302020-03-10T07:03:25+5:30

whatsapp join usJoin us
Ranji Trophy Final: Bengal stops Saurashtra | रणजी ट्रॉफी फायनल : बंगालने सौराष्ट्राला रोखले

रणजी ट्रॉफी फायनल : बंगालने सौराष्ट्राला रोखले

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

राजकोट : वेगवान गोलंदाज आकाश दीपने घेतलेल्या तीन बळींच्या जोरावर बंगालने रणजी ट्रॉफी फायनलमध्ये सोमवारी येथे पहिल्या दिवशी सौराष्ट्रविरुद्ध पुनरागमन केले. अंधूक प्रकाशामुळे पहिल्या दिवशी ८०.५ षटकांचा खेळ शक्य झाला. सौराष्ट्रने दिवसअखेर ५ बाद २०६ धावा केल्या.

भारतीय संघाचा फलंदाज चेतेश्वर पुजारा तापामुळे केवळ २४ चेंडू खेळू शकला. तो पाच धावा काढून रिटायर हर्ट झाला.
सौराष्ट्रतर्फे अवि बारोट (५४) व विश्वराज जडेजा (५४) यांनी वैयक्तिक अर्धशतके झळकावली. आकाश दीपने १४.५ षटकांत ४१ धावांच्या मोबदल्यात ३ बळी घेतले.

प्रथमच गृहमैदानावर फायनल खेळत असलेल्या सौराष्ट्रने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारण्याचा निर्णय घेतला. हार्विक देसाई (३८) व बारोट यांनी पहिल्या सत्रात बिनबाद ७७ धावांची मजल मारत संघाला चांगली सुरुवात करून दिली. दोन्ही फलंदाज सुदैवीही ठरले. बंगालने पहिल्या सत्रात तीन कठीण झेल सोडले.

बंगालला दुसऱ्या सत्रात यशासाठी अधिक वेळ प्रतीक्षा करावी लागली नाही. डावखुरा फिरकीपटू शाहबाज अहमदने (१-५६) देसाईला बाद करीत ८२ धावांची भागीदारी संपुष्टात आणली.

त्यानंतर बारोट व जडेजा यांनी सावध खेळ केला. बारोट १४२ चेंडूंना सामोरे जाताना ६ चौकारांच्या मदतीने ५४ धावा केल्यानंतर आकाश दीपचा पहिला बळी ठरला. दोन फलंदाज बाद झाल्यानंतरही पुजारा फलंदाजीसाठी आला नाही. चहापानाला खेळ थांबला त्यावेळी सौराष्ट्रने ६१ षटकांत २ बाद १५५ धावांची मजल मारली होती.

तिसºया सत्रात बंगालने वर्चस्व गाजवले. आकाश दीपने जडेजाला बोल्ड करीत वैयक्तिक दुसरे यश मिळवले. त्यानंतर दोन षटकांनी ईशान पोरेलने (१-३७) यंदाच्या मोसमात संघातर्फे सर्वाधिक धावा करणाºया शेल्डन जॅक्सनला बाद केले. जॅक्सनने १५ चेंडूंमध्ये ३ चौकारांच्या मदतीने १४ धावा केल्या. जॅक्सन बाद झाल्यानंतर पुजारा खेळपट्टीवर आला, पण तो आजारी असल्याचे दिसत होते. २४ चेंडू खेळल्यानंतर तो रिटायर हर्ट झाला. डावाच्या ८१ व्या षटकात आकाश दीपने चेतन सकारिया (४) याला बाद करीत तिसरे यश मिळवले. सकारिया बाद झाल्यानंतर पंचांनी अंधूक प्रकाशामुळे पहिल्या दिवसाचा खेळ थांबविण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी उपांत्य फेरीत शतकी खेळी करणारा अर्पित वासवदा (२९) खेळपट्टीवर होता.

बंगालच्या प्रशिक्षकांची खेळपट्टीवर टीका
बंगालचे प्रशिक्षक अरुण लाल यांनी रणजी चषक अंतिम सामन्यातील खेळपट्टीवर टीका केली. ही खेळपट्टी खूप खराब असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच बीसीसीआयने याची चौकशी करावी, अशी मागणी देखील लाल यांनी केली. अंतिम सत्रात चेंडू खूपच खाली राहत आहे. क्युरेटरने आपले काम केले नसल्याचेही ते म्हणाले. अशी दुय्यम दर्जाची खेळपट्टी का बनवली, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

Web Title: Ranji Trophy Final: Bengal stops Saurashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.