Baroda vs Mumbai, Elite Group A , Baroda won by 84 runs Against Mumbai : रणजी करंडक स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात गत विजेत्या मुंबईला पराभवाचा धक्का बसला आहे. दुसरीकडे क्रुणाल पांड्याच्या नेतृत्वाखालील बडोदा संघानं मुंबईला शह देत स्पर्धेची सुरुवात अगदी धमाक्यात केली आहे. घरच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात बडोदा संघाचा कर्णधार क्रुणाल पांड्याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या डावात या संघाने २९० धावा काढल्या.
मुंबई संघाला पेलले नाही २६२ धावांच साधं सोपे वाटणार आव्हान
गत विजेता मुंबई संघ या सामन्यात दबदबा दाखवून देईल, अशीच अपेक्षा होती. कारण नुकतेच मुंबईच्या संघानं शेष भारत संघाला शह देत इराणी करंडक उंचावला होता. पण बडोदा संघाविरुद्धच्या सामन्यात मुंबईचा पहिला डाव २१४ धावांतच आटोपला. पहिल्या डावात बडोदा संघानं ७६ धावांची अल्प आघाडी मिळवली होती. दुसऱ्या डावात मुंबईच्या संघानं प्रतिस्पर्धी बडोदा संघाला १८५ धावांत रोखलं. पण त्यांनी सेट केलेल्या २६२ धावांचे आव्हान काही मुंबईला झेपलं नाही. मुंबईचा दुसरा डाव १७७ धावांतच गळपटला अन् बडोदा संघाने सामना जिंकला.
३ स्टार खेळाडूंचा फ्लॉप शोमुळं मुंबई संघावर ओढावली नामुष्की
मुंबईच्या संघाचा विजयी रथ कायम ठेवण्याची मोठी जबाबदारी ज्या खेळाडूंवर होती त्या स्टार खेळाडूंना लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. परिणामी मुंबईच्या संघावर लाजिरवाण्या पराभवाची नामुष्की ओढावली. दुसऱ्या डावात पृथ्वी शॉ फक्त १२ धावांची भर घालून चालता झाला होता. पहिल्या डावातही त्याचं योगदान हे फक्त ७ धावांचे होते. मुंबईच्या संघाचे नेतृत्व करणाऱ्या अजिंक्य रहाणेनं पहिल्या डावात २९ तर दुसऱ्या डावात फक्त १२ धावांचे योगदान दिले. पहिल्या डावात खातेही उघडू न शकलेल्या श्रेयस अय्यर थोड्या काळासाठी स्थिरावला. पण ३० धावा करून तोही तंबूत परतला. मोठी धावसंख्या करताना तो पुन्हा अडखळला आणि मुंबईचा संघ अडचणीत सापडला. मुंबईकडून पहिल्या डावात आयुष मराठेनं केलेली अर्धशतकी खेळी आणि दुसऱ्या डावात सिद्धेश लाडच्या ५९ धावा वगळता एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही.
बडोदा संघासाठी कोण ठरला विजयाचा हिरो
बडोदा संघाकडून मितेश पटेल यानं पहिल्या डावात ८६ धावांची खेळी केली. जी सामन्यातील सर्वोच्च खेळी ठरली. त्याच्याशिवाय पहिल्या डावात अतित शेठही चमकला होता. ज्याने संघाच्या धावसंख्येत ६६ धावांची भर घातली. दुसऱ्या डावात बॅटिंग कोलमडल्यानंतर क्रुणाल पांड्याने ५५ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. या सगळ्यात भारी ठरला तो भार्गव भट्ट (Bhargav Bhatt) ज्यानं पहिल्या डावात ४ आणि दुसऱ्या डावात ६ विकेट्स घेत मुंबईच कंबरडे मोडले.
Web Title: Ranji Trophy Krunal Pandya Lead Baroda won by 84 runs Against Defending champions Mumbai In Opening Round Bhargav Bhatt star of the show
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.