Ranji Trophy 2024 : महेंद्रसिंग धोनीचा माजी सहकारी केदार जाधवने ( Kedar Jadhav ) वयाच्या ३८ व्या वर्षी अविश्वसनीय कामगिरी केली. रणजी करंडक स्पर्धेत महाराष्ट्र संघाचा कर्णधार केदारने १८२ धावांची स्फोटक खेळी केली. केदारने टीम इंडियाचा विकेटकीपर बॅट्समन इशान किशनच्या होम टीम झारखंडविरुद्ध ही वादळी खेळी केली. या खेळीदरम्यान केदारने अवघ्या १२१ चेंडूत शतक पूर्ण केले. केदारने बाद होण्यापूर्वी २१६ चेंडूत २१ चौकार व ५ षटकारांच्या मदतीने १८२ धावा केल्या.
त्याच्या खेळीमुळे महाराष्ट्राने ५ बाद ६०१ धावांवर पहिला डाव घोषित करून १९८ धावांची आघाडी घेतली. झारखंडने पहिल्या डावात ४०३ धावा केल्या होत्या. केदारशिवाय पीएच शाहनेही १३६ धावा केल्या. त्याने १४ चौकार आणि ३ षटकार मारले. केदारने चौथ्या विकेटसाठी अंकित बावणेसोबत ३२१ चेंडूत २४९ धावांची भागीदारी केली. अंकितने २१३ चेंडूंत १७ चौकारांसह १३१ धावा केल्या. झारखंडकडून शाहबाज नदीम, आशिष कुमार आणि वरुण आरोन यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.
तत्पूर्वी, विराट सिंगच्या शतकाच्या जोरावर झारखंडने पहिल्या डावात ४०३ धावा केल्या होत्या. झारखंडने दुसऱ्या डावात बिनबाद ६६ धावा केल्या आहेत आणि ते अजूनही १३२ धावांनी पिछाडीवर आहेत. केदारने फेब्रुवारी २०२० मध्ये भारताविरुद्ध शेवटचा सामना खेळला होता. त्यानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या वन डे सामन्यात त्याने ९ केल्या होत्या आणि त्यानंतर तो संघाबाहेर आहे. जाधव आयपीएलमध्ये महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जकडून खेळला आहे.