Ruturaj Gaikwad Century against Mumbai in Ranji Trophy: एका बाजूला भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिका सुरु असताना दुसऱ्या बाजूला देशांतर्गत क्रिकेटमधील प्रतिष्ठित आणि लोकप्रिय रणजी करंडक स्पर्धाही सुरु आहे. आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अनेक स्टार क्रिकेटर्सच्या दृष्टिने रणजी करंडक स्पर्धा महत्त्वाची आहे. त्यातीलच एक नाव म्हणजे ऋतुराज गायकवाड.मुंबई विरुद्धच्या सामन्यातील पहिल्या डावात खाते उघडण्यात अपयशी ठरलेल्या या पुणेकरानं दुसऱ्या डावात शतकी खेळीसह कडक रिप्लाय दिला आहे.
१०० पेक्षा अधिकच्या स्ट्राइक रेटनं बॅटिंग करत ठोकली सेंच्युरी
रणजी करंडक स्पर्धेत ऋतुराज गायकवाड हा महाराष्ट्र संघाचे नेतृत्व करत आहे. या स्पर्धेतील दुसऱ्या फेरीतील महाराष्ट्र विरुद्ध मुंबई असा सामना रंगला आहे. ऋतुराज गायकवाडनं धमाकेदार खेळी करत शतक झळकावले आहे. १०० पेक्षा अधिकच्या स्ट्राइक रेटनं बॅटिंग करत ऋतुराज गायकवाडनं अवघ्या ८७ चेंडूत शतक पूर्ण केले. संघ अडचणीत असताना कोणत्याही खेळाडूसाठी सर्वोत्तम खेळ करणं आव्हानात्मक असतं. ते आव्हान ऋतुराज गायकवाडनं पेलून दाखवल्याचे दिसते.
मुंबई भक्कम स्थितीत, महाराष्ट्र संघाला संकटातून बाहेर काढण्यासाठी कॅप्टन ऋतुराजनं घेतला पुढाकार
रणजी करंडक स्पर्धेतील मुंबई विरुद्धच्या सामन्यातील पहिल्या डावात महाराष्ट्राचा संघ अवघ्या १२६ धावांत आटोपला होता. त्यानंतर आयुष म्हात्रे १७६ (२३२) आणि श्रेयस अय्यरनं १४२ (१९०) केलेल्या मोठ्या खेळीच्या जोरावर मुंबईच्या संघाने पहिल्या डावात सर्वबाद ४४१ धावा केल्या होत्या. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील मुंबई संघानं ३१५ धावांची मोठी आघाडी घेतल्यामुळे महाराष्ट्र संघ अधिक अडचणीत सापडल्याचे दिसत असताना ऋतुराजच्या शतकी खेळीनं संघाला मोठा दिलासा मिळाला आहे. त्याच्यासह सचिन धस हा देखील शतकाच्या दिशेनं वाटचाल करताना दिसते.