कोलकाता - गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेल्या कोरोनाच्या संसर्गाचा फटका आता क्रिकेटलाही बसू लागला आहे. बंगाल क्रिकेट संघातील काही खेळाडूंना कोरोनाचा संसर्ग झाल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे १३ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या रणजी करंडक स्पर्धेबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी सोमवारी मोठी घोषणा केली आहे. कोरोना वाढत असला तरी रणजी करंडक स्पर्धा ही नियोजित वेळापत्रकाप्रमाणे होणार असल्याचे गांगुली यांनी स्पष्ट केले आहे.
कोरोना विषाणूच्या संसर्गाचा फटका जगभरातील क्रीडा विश्वाला बसला आहे. यामध्ये युरोपमधील क्रीडाजगत मोठ्या प्रमाणावर प्रभावित झाले आहे. क्रिकेट, फुटबॉल आणि इतर खेळांमधील खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला संसर्ग झाल्याने अनेक स्पर्धा रद्द झाल्या आहेत.
सौरव गांगुली यांनी न्यूज एजन्सी एएनआयने सांगितले की, होय रणजी करंडक स्पर्धा ही नियोजित वेळापत्रकानुसार खेळली जाईल. रणजी करंडक स्पर्धा १३ जानेवारी ते २० मार्चपर्यंत खेळली जाणार आहे. कोलकात्यामध्ये गटसाखळीमधील त्रयस्त सामन्यांसोबतच बाद फेरीचे सामने खेळले जाणार आहेत.दरम्यान, देशातील सर्वात मानाची स्पर्धा असलेल्या रणजी करंडक स्पर्धेवरही कोरोनाचे सावट घोंगावू लागले असून, स्पर्धा सुरू होण्यास १० दिवस असतानाच बंगालच्या रणजी संघातील सात सदस्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या संघामधील सुदीप चटर्जी, अनुस्तुप मुजुमदार, काझी जुनैद सैफी, गीत पुरी, प्रदीप्त प्रमाणिक, सुरजीत यादव आणि सहाय्यक प्रशिक्षक सौराशिष लाहिडी यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.