मुंबई : बाद फेरी निश्चित करण्यासाठी विजय महत्त्वपूर्ण असलेल्या सामन्यात अखेर मुंबईला सामना अनिर्णित राखण्यावर समाधान मानावे लागले. आंध्र प्रदेशविरुद्ध झालेल्या या सामन्यात मुंबईकरांनी पहिल्या डावात घेतलेल्या आघाडीच्या जोरावर ३ गुणांची वसूली करत बाद फेरीच्या आशा अद्याप कायम ठेवल्या आहेत. मात्र, असे असले तरी पुढील सामन्यात मुंबईला कोणत्याही परिस्थितीमध्ये विजय मिळवावाच लागणार. श्रीकर भरत आणि रिकी भुई यांनी दमदार अर्धशतक झळकावताना मुंबईला निर्णायक विजयापासून दूर ठेवले. पहिल्या डावात शतक झळकावणारा मुंबईकर पृथ्वी शॉ याला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.
ओंगोळे येथील सीएसआर शर्मा कॉलेज मैदानावर झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजीची संधी मिळाल्यानंतर मुंबईचा पहिला डाव ३३२ धावांत संपुष्टात आला. युवा पृथ्वी शॉने पुन्हा तडाखेबंद शतकी खेळी करत मुंबईसाठी महत्त्वपूर्ण कामगिरी केली. यानंतर यजमानांना २१५ धावांमध्ये गुंडाळून मुंबईने ११७ धावांची आघाडी घेतली होती.
चौथ्या दिवशी सुरुवातीला मुंबईने आपला दुसरा डाव ६ बाद २७९ धावांवर घोषित करुन यजमानांना विजयासाठी ८१ षटकांमध्ये ३९७ धावांचे कठीण आव्हान दिले. दिवसअखेर आंध्रच्या फलंदाजांनी संयमी झुंज दिली आणि ५ बाद २१९ धावांची मजल मारत सामना अनिर्णित राखण्यात यश मिळवले. यासह मुंबईने पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर ३ गुण, तर आंध्र प्रदेशने एक गुण मिळवला. आता मुंबईचे ५ सामन्यांतून १४ गुण झाले असून बाद फेरीतील प्रवेशासाठी त्यांना २५ नोव्हेंबरपासून वानखेडे स्टेडियमवर होत असलेल्या त्रिपूराविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवणे अनिवार्य आहे.
भरत (६८) आणि रिकी (५५) यांनी शानदार अर्धशतक झळकावताना आंध्र प्रदेशचा पराभव टाळला. त्याचवेळी, डीबी प्रशांत कुमार (४०), हनुमा विहारी (१५), बी. सुमांथ (११) अपयशी ठरल्याने यजमानांचा डाव अडचणीत आला होता. परंतु, भरत आणि रिकी यांनी मुंबईला विजय मिळवू दिला नाही. शार्दुल ठाकूर (२/५२) आणि कर्श कोठारी (३/५५) यांनी अचूक मारा करत यजमानांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला.
संक्षिप्त धावफलक :
मुंबई (पहिला डाव) : १३२ षटकात सर्वबाद ३३२ धावा आणि (दुसरा डाव) : ५७ षटकात ६ बाद २७९ धावा घोषित (श्रेयस अय्यर ८९, जय बिस्त ३६, सूर्यकुमार यादव ३३, अभिषेक नायर नाबाद ३८; पी. विजयकुमार २/६३).
आंध्र प्रदेश (पहिला डाव) : ७७ षटकात सर्वबाद २१५ धावा आणि (दुसरा डाव) : ८१ षटकात ५ बाद २१९ धावा (श्रीकर भरत ६८, रिकी भुई ५५; कर्श कोठारी ३/५५, शार्दुल ठाकूर २/५२)
Web Title: Ranji Trophy: Mumbai retained the hopes of the tournament, Andhra Pradesh prevented them from winning
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.