भारतीय क्रिकेट संघातील स्टार खेळाडू चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेआधी रणजी करंडक स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. तब्बल १२ वर्षांनी रणजी मॅचसाठी सज्ज असलेल्या कोहलीची 'विराट' चर्चा चांगलीच रंगतीये. त्याच्याशिवाय आणखी एक चेहरा आहे ज्याच्यावर रणजी कंरडक स्पर्धेतील लढतीवेळी सर्वांच्या नजरा असतील. यामागचं कारणही तसंच आहे. जाणून घेऊयात कोण आहे तो खेळाडू अन् काय असेल त्याच्यासमोरील चॅलेंज
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
नुसता चेंडू नाही तर सामना वळवण्याची क्षमता असणारा खेळाडू
विराट कोहलीशिवाय ज्या खेळाडूवर सर्वांच्या नजरा असतील तो खेळाडू आहे कुलदीप यादव. या फिरकीपटूला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघात संधी मिळाली आहे. कुलदीप यादव हा चेंडूप्रमाणे सामना वळवण्यासाठी ओळखला जातो. पण मागील चार महिन्यापासून दुखापतीमुळे तो संघाबाहेर आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा आणि त्याआधी इंग्लंड विरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेआधी कुलदीप यादवसमसोर फिटनेस सिद्ध करण्याचे चॅलेंज असेल.
कोणत्या संघाकडून मैदानात उतरणार आहे कुलदीप यादव?
कुलदीप यादवनं सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रॅक्टिस सेशनचे काही व्हिडिओ शेअर करत पुन्हा एकदा मैदानात खेळण्यासाठी तयार असल्याचे संकेत दिले आहेत. पण त्याआधी त्याला रणजी करंडक स्पर्धेतील लढतीत स्वत:ला सिद्ध करावे लागले. देशांतर्गत क्रिकेटमध्ये कुलदीप यादव हा उत्तर प्रदेशच्या ताफ्यातून खेळतो. याच संघाकडून तो मैदानात उतरल्याचे पाहायला मिळेल.
कुलदीपशिवाय केएल राहुलवरही असतील नजरा
रणजी करंडक स्पर्धेतील अखेरच्या फेरीतील लढतींना ३० जानेवारीपासून सुरुवात होत आहे. कुलदीप यादव मध्य प्रदेश विरुद्धच्या सामन्यात कशी कामगिरी करणार याकडे सर्वांच्या नजरा असतील. हा सामना इंदूरच्या होळकल क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. दुसरीकडे लोकेश राहुल कर्नाटकच्या ताफ्यातून हरयाणाविरुद्धच्या सामन्यात मैदानात उतरेल. हा सामना बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगणार आहे.