मुंबई : १८ वर्षीय युवा फलंदाज पृथ्वी शॉ याने आपला धडाकेबाज फॉर्म कायम राखताना सातव्या प्रथम श्रेणी सामन्यात पाचवे विक्रमी शतक झळकावत रणजी ट्रॉफी सामन्यात आंध्र प्रदेश विरुद्ध मुंबईसाठी महत्त्वपूर्ण खेळी केली. दरम्यान, पृथ्वीने झळकावलेल्या शतकानंतरही मुंबईने पहिल्या दिवसअखेर ६ बाद २४८ अशी मर्यादित मजल मारली. मधल्या फळीतील सिद्धेश लाड (८६) यानेही प्रतिकूल परिस्थितीमध्ये अर्धशतक झळकावत मुंबईला सावरले. मात्र, त्याचे शतक केवळ १४ धावांनी हुकले.
मुंबईत बडोद्याविरुद्ध पाचशेवा रणजी सामना खेळताना मुंबईकर पराभवाच्या छायेत आले होते. परंतु, दुसºया डावात लाडने केलेल्या संयमी शतकामुळे मुंबईने सामना अनिर्णीत राखण्यात यश मिळवले. पुन्हा एकदा लाडने याच खेळाची पुनरावृत्ती केली. मात्र, त्याआधी पृथ्वीने आपले अप्रतिम कौशल्य दाखवताना आणखी एक शतकी तडाखा दिला. त्याने गेल्या तीन सामन्यांत दोन शतके आणि एक अर्धशतक झळकावण्याची कामगिरी केली आहे.
यजमान आंध्र प्रदेशने नाणेफेक जिंकून मुंबईला प्रथम फलंदाजीस निमंत्रित केले. परंतु, पुन्हा एकदा फलंदाजीला गळती लागल्याने मुंबईचा डाव ३ बाद ६४ धावा असा अडचणीत आला.
या वेळी एका बाजूने टिकून राहिलेल्या पृथ्वीने पुन्हा एकदा सर्व जबाबदारी आपल्याकडे घेत १७३ चेंडूत १४ चौकार व एका षटकारासह ११४ धावांची खेळी केली. त्याने सिद्धेश लाडसह चौथ्या विकेटसाठी १२५ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. अय्याप्पा बंदारूने पृथ्वीला बाद करून ही जोडी फोडली.
लगेच कर्णधार आदित्य तरे (०) भोपळाही न फोडता बाद झाल्यानंतर लाडने सर्व सूत्रे आपल्याकडे घेत २०३ चेंडूंमध्ये ९ चौकार व २ षटकारांसह ८६ धावांची संयमी खेळी केली. केव्ही शशिकांत याने लाडला बाद करून मुंबईला पुन्हा अडचणीत आणले. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा अभिषेक नायर (२१*) आणि धवल कुलकर्णी (०*) खेळपट्टीवर होते. अय्याप्पाने ८७ धावांत ३, तर पी. विजय कुमारने ५५ धावांत २ बळी घेत मुंबईला ठरावीक अंतराने धक्के दिले. जय बिस्ता (४), श्रेयस अय्यर (०), सूर्यकुमार यादव (१८) या आघाडीच्या फलंदाजांचे अपयश मुंबईला महागात पडले.
पृथ्वी रेकॉर्ड....
कारकिर्दीतील सातवा प्रथम श्रेणी सामना खेळताना पृथ्वीने विक्रमी पाचवे शतक झळकावले. भविष्यातला मास्टर ब्लास्टर म्हणून पाहिले जात असलेल्या पृथ्वीने मोक्याच्या वेळी शतक झळकावत पुन्हा एकदा मुंबईला सावरले.
दिवसेंदिवस पृथ्वीचा खेळ उंचावत आहे. वयाच्या १८व्या वर्षी ५ प्रथम श्रेणी झळकावताना तो सचिन तेंडुलकरनंतरचा दुसरा फलंदाज ठरला. सचिनने याच वयामध्ये एकूण ७ प्रथम श्रेणी शतके ठोकली होती. विशेष म्हणजे पृथ्वीने रणजी आणि दुलीप ट्रॉफी स्पर्धेत पदार्पणातच शतक ठोकले होते.
जर इराणी स्पर्धेतही त्याने शतक ठोकले, तर तो सचिनच्या विक्रमाशी बरोबरी करेल. आतापर्यंत तिन्ही प्रतिष्ठेच्या स्पर्धेत पदार्पणामध्ये शतक झळकावण्याचा पराक्रम केवळ सचिनच्या नावावर आहे.
संक्षिप्त धावफलक :
मुंबई (पहिला डाव) : ९० षटकात ६ बाद २४८ धावा (पृथ्वी शॉ ११४, सिध्देश लाड ८६; अय्याप्पा बंदारु ३/८७, पी. विजय कुमार २/५५)
Web Title: Ranji Trophy: Prithvi Shouke hits century again, Siddesh Lad's half-century
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.