मुंबईच्या शरद पवार क्रिकेट अकादमी, बीकेसी येथे मुंबई विरुद्ध कर्नाटक हा रणजी करंडक स्पर्धेचा सामना सुरु आहे. याआधीच्या सामन्यात रेल्वेकडून हार पत्करावी लागल्यानं मुंबईच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यात अजिंक्य रहाणे आणि पृथ्वी शॉ हे टीम इंडियातील शिलेदार मुंबईचे प्रतिनिधित्व करत असल्यानं या सामन्याची उत्सुकता आणखी शिगेला पोहोचली आहे. पण, दुसरीकडे मोहालीत सुरु असलेल्या सामन्यात राडा पाहायला मिळाला. मोहालीत दिल्ली विरुद्ध पंजाब यांच्यातल्या सामन्यात टीम इंडियाच्या फलंदाजाच्या बालहट्टानं सामना गाजवला. त्याच्या रुद्रावतारानं पंचांना आपला निर्णय बदलावा लागला आणि त्याचा निषेध म्हणून प्रतिस्पर्धी संघांनी मैदान सोडलं.. आता हा फलंदाज कोण आणि नेमकं काय घडलं ते जाणून घेऊया...
दिल्ली आणि पंजाब यांच्यात मोहालीच्या आयएस बिंद्रा क्रिकेट स्टेडियमवर सामना सुरू आहे. या सामन्यात पंजाबनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सनवीर सिंग आणि शुबमन गिल यांनी पंजाबच्या डावाची सुरुवात केली, परंतु दुसऱ्याच षटकात सनवीर माघारी परतला. सुबोध भट्टीनं त्याला खातंही खोलू न देता पायचीत केले. त्यानंत टीम इंडियाचा युवा शिलेदार शुबमन आणि गुरकिरत मन यांनी पंजाबच्या डावाला आकार दिला. पण, या भागीदारी दरम्यान राडा घालणारा प्रसंग घडला.
कोलकाता नाइट रायडर्सचा शुबमन 18 धावांवर असताना अंपायर पश्चिम पाठक यांनी बाद जाहीर केले. शुबमनला त्यांचा हा निर्णय काही आवडला नाही आणि त्यानं मैदानावरच ठाण मांडला. पाठक यांचा हा पहिलाच सामना होता आणि शुबमनने त्यांना शिविगाळ केल्याचा आरोप दिल्लीचा उपकर्णधार नितीश राणानं केला. शुबमनच्या आक्रमक पवित्र्यानंतर पाठक यांनी त्यांचा निर्णय बदलला. पण, त्यानंतर दिल्लीच्या संघानं निषेध नोंदवला आणि मैदान सोडले. सामन्यातील तणाव बराच काळ कायम राहिल्यानं अखेरीस सामनाधिकाऱ्यांना मधस्थी करावी लागली. काही काळानं सामना पुन्हा सुरू झाला.
पण, अवघ्या पाच धावांची भर घालून शुबमन बाद झाला. सिमरनजीत सिंगनं त्याला (23) झेलबाद करून माघारी पाठवले.