पुणे : गौतम गंभीरसारखा स्टार फलंदाज स्वस्तात बाद होऊनही नितीश राणा याने झळकावलेले नाबाद शतक आणि वृषभ पंतच्या आक्रमक ९९ धावांच्या जोरावर रणजी चषक क्रिकेट स्पर्धेत पहिल्या दिवशी दिल्लीने महाराष्ट्राविरूद्ध ४ बाद २६२ धावा केल्या.नवी दिल्लीतील पालम एयरफोर्स कॉम्प्लेक्सच्या मैदानावर ही लढत शुक्रवारपासून सुरू झाली.दिल्लीसह संपूर्ण उत्तर भारताला भेडसावत असलेल्या धुक्याच्या समस्येमुळे पहिल्या दिवशी ६२ षटकांचाच खेळ होऊ शकला. यात नितीश राणा याने नाबाद शतक झळकावताना १५७ चेंडूंत ३ षटकार आणि १२ चौकारांसह ११० धावा केल्या आहेत. वृषभ पंतचे शतक अवघ्या एका धावेने हुकले. त्याने ११० चेंडूंत ९९ धावा फटकावताना ६ गगनचुंबी षटकार आणि ८ चौकारांची उधळण केली. महाराष्ट्रातर्फे फिरकीपटू चिराग खुराणा याने ७१ धावांत सर्वाधिक २ गडी बाद केले. निकीत धुमाळ आणि प्रदीप दाढे यांना प्रत्येकी १ गडी बाद करण्यात यश लाभले.
दिल्लीचा कर्णधार इशांत शर्मा याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, महाराष्ट्राच्या गोलंदाजांनी १० षटकांच्या आत सलामी जोडी गारद करीत दिल्लीची अवस्था २ बाद २६ अशी केली. निकीत धुमाळने पाचव्याच षटकात करणाºया दिग्गज सलामीवीर कसोटीपटू गंभीरला (१) पायचित पकडून दिल्लीला हादरा दिला. दुसरा सलामीवीर अनुज रावतला (२०) झेलबाद केले. यजमान संघ या २ धक्क्यांतून सावरत नाही तोच धु्रव शौर्य (७) याला पॅव्हेलियनमध्ये धाडत चिराग खुराणा याने १६व्या षटकातच त्यांची अवस्था ३ बाद ५५ अशी केली.अशा अडचणीच्या स्थितीत राणा-पंत जोडीने ‘अटॅक इज द बेस्ट डिफेन्स’ या तत्वाचा अवलंब करीत महाराष्ट्राच्या गोलंदाजांचा दबाव झुगारून दिला आणि फटकेबाजी केली. या दोघांनी महाराष्ट्राच्या गोलंदाजांवर प्रतिआक्रमण रचून ३६.४ षटकांत १६८ धावांची वेगवान भागीदारी केली. अखेर खुराणाने शतकाकडे वाटचाल करीत असलेल्या वृषभ पंतला बाद करीत महाराष्ट्राला चौथे यश मिळवून दिले. दिवसाचा खेळ संपला तेव्हा मिलिंदकुमार ८ धावा करून राणाला साथ देत होता.धावफलक :दिल्ली : पहिला डाव : अनुज रावत झे. नौशाद शोख गो. दाढे २०, गौतम गंभीर पायचित गो. धुमाळ १, ध्रुव शौर्य झे. ऋतुराज गायकवाड गो. खुराणा ७, नितीश राणा खेळत आहे ११०, वृषभ पंत झे. अंकित बावणे गो. खुराणा ९९, मिलिंदकुमार खेळत आहे ८.अवांतर : १५. एकूण ६२ षटकांत ४ बाद २६०.गडी बाद क्रम : १/११ (गंभीर), २/२६ (रावत), ३/५५ (शौर्य), ४/२२३ (पंत).गोलंदाजी : निकीत धुमाळ १३-१-४८-१. प्रदीप दाढे ११-१-५३-१. चिराग खुराणा २१-१-७१-२. शमसुझमा काझी ४-०-२६-०. राहुल त्रिपाठी २-०-८-०. सत्यजीत बच्छाव ११-२-४०-०.