बंगळुरु : चेतेश्वर पुजाराच्या नाबाद 131 धावांच्या जोरावर सौराष्ट्रने रणजी करंडक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत कर्नाटकवर पाच विकेट राखून विजय मिळवला. कर्नाटकने विजयासाठी ठेवलेले 279 धावांचे लक्ष्य सौराष्ट्रने सहज पार केले. अंतिम फेरीत त्यांच्यासमोर गतविजेत्या विदर्भ संघाचे आव्हान आहे. सौराष्ट्रच्या विजयात शेल्डन जॅक्सनच्या 100 धावाही महत्त्वाच्या ठरल्या. तीन वर्षांनंतर सौराष्ट्रने रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. यापूर्वी त्यांनी 2012-13 व 2015-16 च्या हंगामात अंतिम फेरी गाठली होती.
कर्नाटकच्या पहिल्या डावाच्या 275 धावांच्या प्रत्युत्तरात सौराष्ट्रचा संघ 236 धावांवर माघारी परतला. मात्र, त्यांनी कर्नाटकचा दुसरा डाव 239 धावांवर माघारी परतवला. विजयासाठीच्या 279 धावांचा पाठलाग करताना सौराष्ट्रचे तीन फलंदाज 23 धावांवर माघारी परतले. पुजारा व जॅक्सन यांनी संघाचा डाव सावरला. 68 धावा असताना पुजारा झेलबाद झाला होता, परंतु पंचांनी त्याला बाद दिले नाही. त्याच्यावरून पुजारावर फॅन्स चांगलेच भडकले.