- रोहित नाईक
मुंबई - हुकमी फिरकीपटू शम्स मुलानीने केलेल्या शानदार फिरकी माऱ्याच्या जोरावर मुंबईने रणजी चषक स्पर्धेच्या एलिट अ गटातील सामन्यात ओडिशावर फॉलोऑन लादला. यानंतर मुंबईने ओडिशाची दुसऱ्या डावात तिसऱ्या दिवसअखेर ५ बाद १२६ अशी अवस्था केली. ओडिशा अजूनही १९१ धावांनी मागे आहे.
डावाने किंवा दहा गडी राखून विजय मिळवल्यास मुंबईकडे बोनस गुणाची कमाई करण्याची संधी आहे. पहिल्या डावात ४ बाद ६०२ धावा केल्यानंतर मुंबईने ओडिशाला ९४.३ षटकांत २८५ धावांत गुंडाळत ३१७ धावांची भक्कम आघाडी घेतली. शम्सने ११५ धावांत ६ बळी घेतले. हिमांशू सिंगनेही ५३ धावांत ३ बळी घेत त्याला चांगली साथ दिली. ओडिशाकडून संदीप पटनाईकने झुंजार शतक झळकावताना १८७ चेंडूंत ११ चौकार व ४ षटकारांसह १०२ धावा केल्या. देबब्रत प्रधान (४५) आणि आशीर्वाद स्वैन (३७) यांनीही थोडीफार झुंज दिली.
यानंतर ओडिशाची दुसऱ्या डावातही घसरगुंडी उडाली. हिमांशूने ३, तर रॉयस्टन डायस आणि शम्स यांनी प्रत्येकी एक बळी घेत ओडिशाच्या फलंदाजीला खिंडार पाडले. तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा आशीर्वाद स्वैन (४६*) खेळपट्टीवर नाबाद होता. हिमांशूने बिप्लब समंत्रेला (२६) बाद केल्यानंतर दिवसाचा खेळ थांबला. पहिल्या डावातील शतकवीर संदीप (३९) दुसऱ्या डावात लवकर बाद झाल्याने मुंबईने सामन्यावर पूर्ण नियंत्रण मिळवले.
संक्षिप्त धावफलक
मुंबई (पहिला डाव) : १२३.५ षटकांत ४ बाद ६०२ धावा - घोषित.
ओडिशा (पहिला डाव) : ९४.३ षटकांत सर्व बाद २८५ धावा (संदीप पटनाईक १०२, देबब्रत प्रधान ४५, अनुराग सारंगी ३९, आशीर्वाद स्वैन ३७; शम्स मुलानी ६/११५, हिमांशू सिंग ३/५३.)
ओडिशा (दुसरा डाव): ४२ षटकांत ५ बाद १२६ धावा (आशीर्वाद स्वैन खेळत आहे ४६, संदीप पटनाईक ३९, बिप्लब समांत्रे २६; हिमांशू सिंग ३/४५, रॉयस्टन डायस १/१९, शम्स मुलानी १/२६.)
Web Title: Ranji Trophy: Shams took Odisha spin; After imposing the follow on, Mumbai need 5 wickets, Odisha trail by 191 runs
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.