भारतातील देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपला एक वेगळाच दबदबा निर्माण करणारा मनोज तिवारी ( Manoj Tiwari ) प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्त झाला. रणजी करंडक स्पर्धेत बंगालकडून तो काल शेवटचा सामना खेळला आणि त्यानंतर त्याने कारकीर्दित आलेल्या बऱ्या-वाईट आठवणींना उजाळा दिला. त्याने भारतीय संघातील निवडीबाबत त्याच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडताना माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला काही तिखट प्रश्न केले. विराट, रोहित, सुरेश रैना यांचेही नाव घेत त्याने बरेच काही म्हटले. पण, त्याच्या एका विधानाने BCCI ने त्याच्यावर त्वरित कारवाई केली.
शतक मारूनही मला का बाहेर बसवलं? भारतीय खेळाडूचा MS Dhoni वर गंभीर आरोप
भारताच्या प्रमुख देशांतर्गत स्पर्धा रणजी ट्रॉफीच्या परिस्थितीबद्दल निराशा व्यक्त केल्याबद्दल, बंगालचा माजी फलंदाज मनोज तिवारीला त्याच्या मॅच फीमधील २०% रक्कम दंड म्हणून भरावी लागणार आहे. निवृत्तीनंतर दुसऱ्याच दिवशी तिवारीने हा खुलासा केला. १० फेब्रुवारीला मनोज तिवारीने ट्विट केले आणि रणजी ट्रॉफीबद्दलची निराशा व्यक्त केली व पुढील हंगामापासून ही स्पर्धा रद्द करावी असे मतही व्यक्त केले.
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये तिवारीने १४८ सामन्यांत ३० शतकं व ४५ अर्धशतकांसह आणि नाबाद ३०३ धावांच्या वैयक्तिक खेळीसह एकूण १०१९५ धावा केल्या आहेत. लिस्ट ए क्रिकेट व ट्वेंटी-२०त त्याच्या नावावर अनुक्रमे ५५८१ व ३४३६ धावा आहेत. "पुढील मोसमापासून रणजी ट्रॉफी कॅलेंडरमधून काढून टाकली पाहिजे. स्पर्धेत अनेक गोष्टी चुकीच्या होत आहेत. समृद्ध इतिहास असलेली ही प्रतिष्ठित स्पर्धा वाचवण्यासाठी अनेक गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज आहे. ही स्पर्धा तिचे आकर्षण आणि महत्त्व गमावत आहे," असे तिवारीने त्याच्या X हँडरवर लिहीले.