भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCC) देशांतर्गत क्रिकेटमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. सचिव जय शाह ( Jay Shah) यांनी Apex Council ला देशांतर्गत क्रिकेटच्या २०२४-२५ हंगामाला सुरुवात होण्यापूर्वी काही बदल सुचवले आहेत. त्यानुसार आगामी पर्वात तीन महत्त्वाचे बदल पाहायला मिळतील. रणजी करंडक स्पर्धेच्या ( २०२३-२४) मागील पर्वातील सामन्यानंतर मुंबईचा अष्टपैलू खेळाडू शार्दूल ठाकूर याने सलग सामन्यांमुळे थकवा येत असल्याची नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे खेळाडूंच्या मानसिक व शारीरिक तंदुरुस्तीवर परिणाम होत असल्याचेही त्याचे म्हणणे होते. त्यामुळेच आता आगामी रणजी करंडक स्पर्धा दोन टप्प्यांत खेळवण्यात येणार आहे.
भारतीय क्रिकेटचे देशांतर्गत क्रिकेटला दुलीप ट्रॉफीने सुरुवात होईल. त्यानंतर इराणी ट्रॉफी आणि रणजी करंडक स्पर्धेतील पहिले पाच लीग सामने होतील. हे सर्व झाल्यानंतर काही काळाचा गॅप असेल. त्या दरम्यान सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी आणि विजय हजारे ट्रॉफी या मर्यादित षटकांच्या स्पर्धा खेळवल्या जातील. या स्पर्धा झाल्यानंतर रणजी करंडक स्पर्धेच्या दोन साखळी सामने व बाद फेरीचे सामने होतील.
त्याचवेळी जय शाह यांनी सी के नायुडू ट्रॉफी २३ वर्षांखालील स्पर्धेतून टॉस हद्दपार करण्यात यावा, असा प्रस्ताव ठेवला. या स्पर्धेत पाहुण्या संघाला प्रथम फलंदाजी की गोलंदाज याचा निर्णय घेण्याचा मान मिळेल आणि नवीन गुणपद्धतही लागू करण्यात येणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास वरिष्ठ स्तरावरही त्याची अंमलबजावणी केली जाईल. जय शाह यांनी असेही सुचवले आहे की राष्ट्रीय निवडकर्ते विभागीय निवड समित्यांऐवजी दुलीप करंडक संघ निवडतील.