मुंबई : रणजी चषक स्पर्धेत यंदाचे सत्र चार गटात खेळविण्यात आल्यानंतर पुढील सत्रापासून ही स्पर्धा जुन्या तीन गटांमध्येच खेळविण्यात यावी, असा सल्ला काही राज्यांच्या क्रिकेट संघांनी सुचविला आहे. सोमवारी मुंबईत रणजी चषक स्पर्धेचे प्रशिक्षक आणि कर्णधारांचे एक सम्मेलन पार पाडले. यामध्ये यावेळी हा प्रस्ताव ठेवण्यात आला. या सम्मेलनामध्ये सहभागी झालेल्या एका कर्णधाराने आपले नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिली.
विशेष म्हणजे या प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेच्या आठ दशकांच्या इतिहासामध्ये गतमोसमात पहिल्यांदाच तीन ऐवजी चार गटांमध्ये सामने खेळविले गेले. यामध्ये विदर्भने स्पर्धा इतिहासात पहिल्यांदाच जेतेपदाला गवसणी घातली.
सम्मेलनामध्ये सहभागी झालेल्या कर्णधाराने वृत्तसंस्थेला माहिती देताना सांगितले की, ‘स्पर्धा कार्यक्रम, पंचांची कामगिरी अशा काही गोष्टींवर आम्ही चर्चा केली. त्याचप्रमाणे रणजी स्पर्धा चार ऐवजी तीन गटांमध्ये खेळविण्याचा पुन्हा विचार करण्यात यावा यावरही चर्चा झाली.’ स्पर्धेत तीन गट असल्याने सामन्यांची संख्या वाढेल आणि यामुळे खेळाडूंना अधिक संधी मिळते. यावर कर्णधार म्हणाला की, ‘जास्त सामने खेळण्यास मिळाले तर एखाद्या सामन्यात पराभूत झाल्यावर पुढील सामन्यात खेळ सुधारण्याची संधी मिळू शकते.’ त्याचप्रमाणे अनेक संघांनी यावेळी तीन गटांची मागणी केल्याची माहितीही कर्णधाराने यावेळी दिली.
दरम्यान, देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळपट्टीचा उंचावलेला दर्जा आणि खेळाडूंच्या मानधनामध्ये केलेली वाढ यावर प्रत्येकजण खूश असल्याची माहितीही मिळाली. या सम्मेलनामध्ये देण्यात आलेल्या सल्ल्यांवर बीसीसीआयची तांत्रिक समितीच्या बैठकीत पुढील मोसमाच्या देशांतर्गत स्पर्धेला अंतिम स्वरुप देण्याआधी चर्चा होण्याची शक्यता आहे.
Web Title: In the Ranji Trophy, three teams should be played instead of four, the state team gave advice to the BCCI
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.