- रोहित नाईक
मुंबई - गतविजेत्या मुंबईने शानदार फलंदाजीच्या जोरावर यंदाच्या रणजी चषक स्पर्धेतील आपल्या चौथ्या सामन्यात ओडीशाविरुद्ध बुधवारी पहिल्याच दिवशी ९० षटकांत ३ बाद ३८५ धावांचा डोंगर उभारला.
श्रेयस अय्यरने नाबाद दीडशतक, तर सिद्धेश लाडने नाबाद शतक ठोकले. १३ धावांवर खेळत असताना सिद्धेशचा झेल सुटला होता. हे जीवदान ओडिशाला खूप महागडे ठरले.
- पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा अय्यर १६४ चेंडूंत १८ चौकार व ४ षटकारांसह नाबाद १५२ धावांवर, तर सिद्धेश २३४ चेंडूंत १४ चौकारांसह नाबाद ११६ धावांवर खेळत होता. दोघांनी चौथ्या गड्यासाठी २९८ चेंडूंत २३१ धावांची नाबाद भागीदारी केली.
- बीकेसी येथील एमसीए स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात ओडिशाने नाणेफेक जिंकून यजमानांना फलंदाजीचे निमंत्रण दिले. आयुष म्हात्रेला (१८) झटपट बाद करत ओडिशाने दमदार सुरुवात केली. परंतु, अंगक्रिश रघुवंशी व सिद्धेश यांनी दुसऱ्या गड्यासाठी २११ चेंडूंत १३५ धावांची भागीदारी केली.
- बिप्लब समंत्रे याने ४१व्या षटकातील पहिल्या दोन चेंडूवर अंगक्रिश व कर्णधार अजिंक्य रहाणे यांना बाद करत मुंबईला हादरे दिले. अंगक्रिशचे पहिले रणजी शतक केवळ २ धावांनी हुकले. त्याने १२४ चेंडूंत १३ चौकार व ३ षटकारांसह ९८ धावा केल्या. यानंतर मात्र लाड-अय्यर यांनी सर्व सूत्रे आपल्याकडे घेतली.
संक्षिप्त धावफलक :
मुंबई (पहिला डाव) : ९० षटकांत ३ बाद ३८५ धावा (श्रेयस अय्यर खेळत आहे १५२, सिद्धेश लाड खेळत आहे ११६, अंगक्रिश रघुवंशी ९२; बिप्लब समंत्रे २/३६, सूर्यकांत प्रधान १/३६.)
Web Title: Ranji Trophy: Unbeaten centuries from Shreyas Iyer, Siddhesh Lad, Mumbai hold on against Odisha
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.