Join us  

मोहम्मद शमीच्या भावाने १४ धावांत घेतल्या ४ विकेट्स; संपूर्ण संघ ६० धावांत तंबूत, भुवीचा पलटवार

Ranji Trophy 2024 : रणजी करंडक स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीतील पहिल्या दिवशी बंगालच्या संघाने मोहम्मद कैफच्या उल्लेखनीय गोलंदाजीच्या जोरावर उत्तर प्रदेश संघावर कुरघोडी केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2024 4:14 PM

Open in App

Ranji Trophy 2024 : रणजी करंडक स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीतील पहिल्या दिवशी बंगालच्या संघाने मोहम्मद कैफच्या उल्लेखनीय गोलंदाजीच्या जोरावर उत्तर प्रदेश संघावर कुरघोडी केली. भारताचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमी दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर असला तरी त्याचा भाऊ मोहम्मद कैफ रणजी करंडक स्पर्धेत आपला दम दाखवतोय. रणजी करंडक स्पर्धेत दुसराच सामना खेळणाऱ्या मोहम्मद कैफने बंगालकडून खेळताना १४ धावांत ४ विकेट्स घेतल्या आणि उत्तर प्रदेशचा संपूर्ण संघ ६० धावांत तंबूत पाठवला.  पण, उत्तर प्रदेशच्या भुवनेश्वर कुमारनेही गोलंदाजीत कमाल दाखवली आहे.  

उत्तर प्रदेशचा पहिला डाव २०.५ षटकांत संपुष्टात आला. शमीच्या भावाने उल्लेखनीय मारा केला. उत्तर प्रदेशचा समर्थ सिंग हा सर्वाधिक १३ धावा करणारा फलंदाज ठरला. कर्णधार नितिश राणाने ११, तर आर्यन जुयलने ११ धावा केल्या. कैफने ५.५-०-१४-४ अशी स्पेल टाकली. दुसरीकडे सुरज सिंधू जैस्वालने ३ आणि इशान पोरेलेने दोन विकेट्स घेतल्या. आंध्रप्रदेशविरुद्धच्या पहिल्या रणजी सामन्यात मोहम्मद कैफने ६२ धावांत ३ बळी टिपले होते.  २०१८ नंतर रणजी करंडक स्पर्धा खेळणाऱ्या भुवनेश्वर कुमारने उत्तर प्रदेश संघाला दिलासा दिला. त्याने ३ विकेट्स घेत बंगालची अवस्था २१ षटकांत ३ बाद ६० अशी केली आहे. बंगालचा श्रेयांश घोष २७ धावांवर खेळतोय.   

टॅग्स :रणजी करंडकमोहम्मद शामी