नागपुर : रणजी करंडक स्पर्धेत सर्वाधिक 41 जेतेपदं नावावर असलेल्या मुंबईच्या संघाला मंगळवारी विदर्भने एक डाव व 145 धावांनी पराभूत केलं. या पराभवामुळे बाद फेरीत प्रवेश करण्याच्या त्यांच्या आशा संपुष्टात आल्या आहेत. त्यामुळे ते जेतेपदाच्या शर्यतीतून बाद झाले आहेत. मुंबईचा माजी कर्णधार आणि सध्या विदर्भकडून खेळणाऱ्या वासीम जाफरच्या 178 धावांनी माजी विजेत्या मुंबईचा घात केला.
विदर्भ संघाच्या फिरकीपटू आदित्य सरवटेने 48 धावा देत 6 विकेट घेत मुंबईचा दुसरा डाव 113 धावांत गुंडाळला. विदर्भाच्या पहिल्या डावातील 511 धावांचा पाठलाग करताना मुंबईचा पहिला डाव 252 धावांवर गडगडला. त्यानंतर विदर्भने त्यांना फॉलोऑन देत विजय साजरा केला. मुंबईचा दुसरा डाव अवघ्या 34.4 षटकांत आटोपला. ध्रुमील मातकरने सर्वाधिक 35 धावा केल्या.
मुंबईला या सत्रात आतापर्यंत एकही सामना जिंकता आलेला नाही. सात सामन्यांतील त्याचा हा दुसरा पराभव आहे. त्यांनी पाच सामने अनिर्णीत राखले असून त्यांच्या खात्यात 11 गुण आहेत. अखेरच्या सामन्यात त्यांना छत्तीसगडचा सामना करावा लागणार आहे. विदर्भने या विजयासह 28 गुणांची कमाई करताना अव्वल स्थान पटकावले. अ आणि ब गटात अव्वल स्थानावर राहणारे पाच संघ उपांत्यापूर्व फेरीत प्रवेश करणार आहेत. मुंबईला अखेरच्या सामन्यात बोनस गुण मिळवूनही अव्वल स्थानावर झेप घेणे शक्य नाही.