Rashid Khan Power Hitting Video, IPL 2022 CSK vs GT: चेन्नई सुपर किंग्ज विरूद्ध गुजरात टायटन्स संघाने हंगामातील पाचवा विजय मिळवला. तर CSKचा हंगामातील पाचवा पराभव झाला. ऋतुराज गायकवाडच्या दमदार ७३ धावांच्या खेळीमुळे चेन्नईने गुजरातला १७० धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना एका षटकात अख्खा सामना पलटला. १८व्या षटकात राशिद खानने ख्रिस जॉर्डनची धुलाई केली आणि कर्णधारपदाला साजेशी कामगिरी करत संघाच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला.
राशिद खान आणि डेव्हिड मिलर फलंदाजी करत असताना डावाला गती प्रदान करण्याची जबाबादारी राशिदने घेतली. ३ षटकांत ४८ धावांची आवश्यकता असताना राशिद खानने ख्रिस जॉर्डनला धू धू धुतले. राशिदने पहिल्या दोन चेंडूवर दोन षटकार लगावले. पहिला सिक्स मिनी हेलिकॉप्टर शॉट खेळत लेग साईडला तर दुसरा फटका ऑफ साईडला मारला. तिसरा चेंडू फुल टॉस आल्यावर राशिदने चौकार लगावला. तर चौथ्या चेंडूवर पुन्हा हेलिकॉप्टन शॉट खेळत षटकार लगावला. त्या षटकात एकूण २५ धावा मिळाल्या सामना जिंकणे गुजरातसाठी सोपे झाले. पाहा राशिदची फटकेबाजी-
दरम्यान, सामन्यात गुजरातने टॉस जिंकून CSK ला फलंदाजीसाठी बोलावले. चेन्नईचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड याने दमदार खेळ केला. ऋतुराज गायकवाडने शानदार अर्धशतक ठोकले. पण त्याला शतकाने हुलकावणी दिली. त्याच्या ७३ धावांच्या खेळीमुळे चेन्नईने गुजरातला १७० धावांचे आव्हान दिले. हे आव्हान पेलताना गुजरातची वरळी फळी ढेपाळली. पण डेव्हिड मिलर संपूर्ण सामन्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर उचलली. त्याने शेवटपर्यंत नाबाद राहत ५१ चेंडूत ८ चौकार आणि ६ षटकारांसह ९४ धावा केल्या. तसेच राशिद खानने मोक्याच्या क्षणी २१ चेंडूत ४० धावांची तुफानी खेळी केली.