Afghanistan Earthquake : भारतात वन डे विश्वचषकाचा थरार रंगला आहे, तर अफगाणिस्तानातभूकंपामुळे तेथील जनता त्रस्त आहे. अफगाणिस्तानचा संघ देखील विश्वचषकासाठी भारतात आला आहे. पण, आपला देश मोठ्या समस्येचा सामना करत असल्याचे पाहून स्टार अष्टपैलू खेळाडू राशिद खान मदतीसाठी पुढे सरसावला आहे. खरं तर राशिद खानने वर्ल्ड कपमध्ये मिळालेली संपूर्ण मॅच फी भूकंपग्रस्तांना देणार असल्याची घोषणा केली आहे. अफगाणिस्तानमधील भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी त्याने हे पाऊल उचलले.
राशिद खानने सोशल मीडियावर एक पोस्ट करत याबाबत माहिती दिली. "अफगाणिस्तानच्या पश्चिमेकडील प्रांतांमध्ये (हेरत, फराह आणि बादघिस) येथे झालेल्या भूकंपाच्या जीवघेण्या परिणामांबद्दल ऐकून मला खूप दुःख झाले. भूकंपामुळे प्रभावित झालेल्यांना मदत करण्यासाठी मी माझे सर्व प्रयत्न करत आहे. त्यासाठी मी वन डे विश्वचषक २०२३ मधील माझी मॅच फी दान करत आहे. आम्ही लवकरच एक फंड रेसिंग मोहीम सुरू करणार आहोत, ज्याद्वारे पीडितांना मदत करता येईल", असे राशिदने पोस्टमध्ये सांगितले.
राशिद खानचा मदतीचा हात अफगाणिस्तानमध्ये भूकंपामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शनिवारी भीषण भूकंप झाला आणि त्यामुळे सर्वत्र हाहाकार माजला. अफगाणिस्तानमध्ये असलेल्या तालिबान सरकारच्या म्हणण्यानुसार, या भूकंपामुळे आतापर्यंत २ हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, ९ हजारहून अधिक लोक जखमी झाले आहेत आणि १३०० हून अधिक घरे उद्ध्वस्त झाली आहेत. अफगाणिस्तानातील या भूकंपामुळे मृतांची आणि जखमींची संख्या झपाट्याने वाढत आहे. दुसरीकडे, अफगाणिस्तानचा स्टार राशिद खान सध्या भारतात आयसीसी वन डे क्रिकेट विश्वचषक खेळत आहे.