मुंबई : यंदाच्या आयपीएलमध्ये अफगाणिस्तानच्या खेळाडूंना संधी देण्यात आली होती. त्यामुळेच रशिद खान आणि मोहम्मद नबी यांना यंदाच्या आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली. सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना रशिदने या संधीचे सोने करून दाखवले आणि आपल्या फिरकीच्या जोरावर बऱ्याच फलंदाजांना नाचवले. पण हाच रशिद आता भारतासाठी डेकेदुखी ठरू शकतो.
अफगाणिस्तानची कामगिरी पाहून आयसीसीने त्यांना कसोटी दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. भारताने अफगाणिस्तानबरोबर पहिला कसोटी सामना खेळण्याचे मान्य केले असून पुढच्या महिन्यात हा सामना होणार आहे. त्यामुळे या सामन्यात भारतीय फलंदाजांसाठी रशिदची फिरकी गोलंदाजी डोकेदुखी ठरू शकते.
यंदाच्या आयपीएलमध्ये रशिदची कामगिरी नेत्रदीपक अशीच झाली आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये 21.8च्या सरासरीने रशिदने 21 बळी मिळवले. आयपीएल खेळताना रशिदला भारतातील खेळपट्टी आणि वातावरणाचा चांगलाच अंदाज आला आहे. त्याचबरोबर आयपीएलमध्ये त्याने भारतीय फलंदाजी चांगलीच जोखली आहे. त्यामुळे या सामन्यात भारतीय फलंदाजांपुढे रशिदचे सर्वात दडपण असेल.