AFG vs SL : आशिया चषकात मंगळवारी अफगाणिस्तान आणि श्रीलंका आमनेसामने होते. रोमहर्षक सामन्यात 'आशियाई किंग्ज' श्रीलंकेने बाजी मारली अन् अफगाणिस्तानच्या तोंडचा घास पळवला. अफगाणिस्तानसमोर विजयासाठी २९२ धावांचे लक्ष्य होते, परंतु सुपर ४ साठी त्यांना ते ३७.१ षटकांत पूर्ण करायचे होते. दोन धावांनी झालेला पराभव अफगाणी चाहत्यांसह त्यांच्या खेळाडूंच्या जिव्हारी लागला. अफगाणिस्तानी संघ सहज विजय मिळवेल असे वाटत असताना श्रीलंकन गोलंदाजांनी कमाल करत प्रतिस्पर्धी संघाला सर्वबाद करत विजय साकारला.
श्रीलंकेने तोंडचा घास पळवल्यानंतर अफगाणिस्तानचा अष्टपैलू खेळाडू राशिद खान भावूक झाला. त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या. खेळात अनेक चढ-उतार येत असतात असे म्हणत राशिदने चाहत्यांसह स्वत:ला धीर देण्याचा प्रयत्न केला. खरं तर राशिदने काल अष्टपैलू खेळी करून मोलाची भूमिका बजावली. पण, आपल्या स्टार खेळाडूची साथ देण्यासाठी कोणताच अफगाणिस्तानचा खेळाडू खेळपट्टीवर अखेरपर्यंत टिकला नाही.
श्रीलंकेने तोंडचा घास पळवलाश्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पथुम निसांका (४१), डिमुथ करूणारत्ने (३२), कुशल मेंडिस (९२) आणि चरिथ असलंका (३६) यांच्या सांघिक खेळीच्या जोरावर श्रीलंकेने धावांचा डोंगर उभारला. आशियाई किंग्जला निर्धारित ५० षटकांत ८ बाद २९१ धावा करता आल्या. श्रीलंकेने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानने देखील सावध खेळी करत सांघिक खेळी केली. मोहम्मद नबीने सर्वाधिक (६५) धावा करून अफगाणिस्तानला लक्ष्यापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला. पण, स्फोटक वाटणाऱ्या नबीला महेश दीक्षानाने बाहेरचा रस्ता दाखवला अन् श्रीलंकेने पुनरागमन केले.
अफगाणिस्ताचा प्रत्येक फलंदाज काल इतिहास घडविण्याच्या निर्धाराने खेळताना दिसला. पण, श्रीलंकेचा युवा फिरकीपटू दुनिथ वेलालगेने एका षटकात दोन मोठे बळी घेत सामना फिरवला. मात्र, अफगाणिस्तानने अखेरच्या क्षणापर्यंत लढत दिली. श्रीलंकेने ३७.४ षटकांत अफगाणिस्तानचा संपूर्ण संघ २८९ धावांवर गुंडाळून सुपर-४ मध्ये धडक मारली.