Join us  

"आम्ही खूप सहन केलं आहे, अफगाणिस्तानच्या लोकांसाठी...", ऐतिहासिक विजयानंतर राशिद भावुक

ICC ODI World Cup 2023 : वन डे विश्वचषकात आज अफगाणिस्तान आणि इंग्लंड यांच्यात सामना खेळवला गेला, ज्यात अफगाणिस्तानने ऐतिहासिक विजय मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2023 10:00 PM

Open in App

ENG vs AFG Live Match | नवी दिल्ली : आपला देश मोठ्या भूकंपाच्या धक्क्याने सावरत असताना अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी बलाढ्य इंग्लंडला पराभूत करून आपल्या देशवासियांनी आनंद साजरा करण्याची संधी दिली. वन डे विश्वचषकात मोठा उलटफेर करत रविवारी अफगाणिस्तानने इंग्लिश संघाचा ६९ धावांनी दारूण पराभव केला. मुजीब उर रहमान आणि राशिद खान यांनी प्रत्येकी ३-३ बळी घेऊन गतविजेत्यांची झोप उडवली. फलंदाजीत सावध खेळी आणि अप्रतिम गोलंदाजीमुळे मुजीब उर रहमानचा सामनावीर पुरस्काराने गौरव करण्यात आला. सामन्यानंतर बोलताना दोन्हीही शिलेदारांनी अफगाणिस्तानातील सद्य स्थितीचा दाखला दिला. भूकंपामुळे प्रभावित झालेल्या अफगाणिस्तानातील लोकांना हा पुरस्कार समर्पित करत असल्याचे मुजीबने म्हटले. 

तसेच आम्ही खूप सहन केलं आहे, त्यामुळे अफगाणिस्तानच्या लोकांसाठी सध्यातरी क्रिकेट हाच आनंदाचा स्रोत असल्याची भावना राशिद खानने व्यक्त केली. इंग्लंडकडून हॅरी ब्रूकने एकतर्फी झुंज दिली पण मुजीब उर रहमानने ६१ धावांवर असताना त्याचा त्रिफळा काढून इंग्लिश संघाच्या विजयाच्या आशांवर पाणी टाकले. रविवारी वन डे विश्वचषकात दिल्लीतील अरूण जेटली स्टेडियमवर इंग्लंड आणि अफगाणिस्तान यांच्यात सामना पार पडला. हॅरी ब्रूक वगळता एकाही इंग्लिश फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. अफगाणिस्तानकडून मुजीब उर रहमान आणि राशिद खान यांनी सर्वाधिक ३-३ बळी घेतले.

इंग्लंडचा दारूण पराभव इंग्लंडचा संघ ४०.३ षटकांत २१५ धावांवर सर्वबाद झाला अन् अफगाणिस्तानने ६९ धावांनी मोठा विजय मिळवून इतिहास रचला. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरचा (९) नवीन-उल-हकने त्रिफळा काढला, तर जो रूट मुजीब उर रहमानच्या गोलंदाजीवर चीतपट झाला. मागील सामन्यातील शतकवीर डेव्हिड मलानला (३२) मोहम्मद नबीने बाहेरचा रस्ता दाखवला. याशिवाय लियाम लिव्हिंगस्टोनला तंबूत पाठवून राशिद खानने सामन्यात रंगत आणली आणि तिथूनच अफगाणिस्तानने विजयाकडे कूच केली. तत्पुर्वी, प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानचे सलामीवीर रहमानुल्लाह गुरबाज आणि इब्राहिन झादरान यांनी पहिल्या बळीसाठी ११४ धावांची मोठी भागीदारी नोंदवली. सुरूवातीला स्फोटक खेळी करणाऱ्या अफगाणिस्तानला शेवट चांगला करण्यात अपयश आले अन् अफगाणिस्तानचा संघ ४९.५ षटकांत २८४ धावा करू शकला. त्यामुळे इंग्लंडला विजयासाठी २८५ धावांचे आव्हान होते, ज्याचा पाठलाग करण्यात गतविजेत्यांना अपयश आले. 

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपइंग्लंडअफगाणिस्तानभूकंप