नवी दिल्ली : सध्या आशिया चषकाचा (Asia Cup 2022) थरार रंगला आहे. भारतीय संघाने आपल्या पहिल्याच सामन्यात विजय मिळवून स्पर्धेत विजयी सलामी दिली आहे. हार्दिक पांड्याने केलेल्या महत्त्वपूर्ण 35 धावांच्या जोरावर संघाने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला धूळ चारली. पांड्याच्या खेळीमुळे जगभरातील आजी माजी क्रिकेटपटूंनी त्यांचे कौतुक केले. अशातच अफगाणिस्तानच्या संघाचा स्टार फिरकीपटू राशिद खानने देखील हार्दिक पांड्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. बांगलादेशविरूद्धच्या सामन्यापूर्वी राशिद खानने म्हटले आहे की, जर तुमच्याकडे हार्दिक पांड्यासारखा खेळाडू असेल तर तो कर्णधारासाठी बरेच पर्याय निर्माण करतो.
पांड्याचे 'हार्दिक'अभिनंदनदरम्यान, हार्दिक पांड्याने पाकिस्तानविरूद्ध अष्टपैलू खेळी करून सर्वांचे लक्ष वेधले. शानदार गोलंदाजी करून त्याने 3 बळी पटकावले तर विजयी षटकार ठोकून संघाला विजय मिळवून दिला. आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सच्या संघाकडून खेळणाऱ्या राशिदने आपल्या कर्णधाराचे कौतुक करताना म्हटले, "जर संघाकडे हार्दिक पांड्यासारखा खेळाडू असेल तर कर्णधारासाठी बरेच पर्याय निर्माण होतात. त्याच्या मेहनतीमुळे हे सर्व साध्य झाले आहे. मागील वर्षी जेव्हा मी त्याच्यासोबत खेळलो तेव्हा मला वाटले की आयपीएलमध्ये कर्णधाराच्या भूमिकेत असताना त्याने खूप सुधारणा केली आहे. जेव्हा एखाद्या खेळाडूला अशा प्रकारची जबाबदारी मिळते तेव्हा तो एक चांगला खेळाडू बनतो", अशा शब्दांत राशिदने पांड्याचे कौतुक केले.
राशिद खान आयपीएलमधील गुजरातच्या संघाचा उपकर्णधार होता आणि हार्दिक पांड्याच्या गैरहजेरीत त्याने एका सामन्यात कर्णधारपदही सांभाळले होते. आयपीएल 2022 चा किताब गुजरात टायटन्सच्या संघाने आपल्या नावावर केला होता. फायनलच्या सामन्यात गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सचा पराभव करून ही किमया साधली.