अफगाणिस्तानचा स्टार क्रिकेटर राशिद खान हा जगातील सर्वोत्तम फिरकीपटूपैकी एक आहे. कमालीच्या फिरकीसह प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजांना गिरकी घ्यायला लावण्यात तो चांगलाच माहिर आहे. पण बॉलिंगशिवाय तो बॅटिंगमध्येही धमाका करू शकतो. अनेकदा त्याने आपल्या भात्यातील फटकेबाजीची झलक दाखवूनही दिली आहे. आता पुन्हा एकदा करामती खानची फटकेबाजीतील अफलातून करामत पाहायला मिळाली. टी-२० क्रिकेटमध्ये तुफान फटकेबाजी करत त्याने स्पर्धेतील जलद अर्धशतकाची नोंद केली. त्याच्या या फटकेबाजीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय.
नेतृत्व करताना दाखवून दिलं फलंदाजीतील कर्तृत्व
अफगाणिस्तानमध्ये सध्या शपगीजा क्रिकेट लीग सुरु आहे. या स्पर्धेत राशिद खान याने आपल्या बॅटिंगमधील ताकद दाखवून दिली. या स्पर्धेत राशिद खान हा 'द स्पीन घर टायगर्स' या संघाचे नेतृत्व करत आहे. २६ चेंडूत ५३ धावांची कडक खेळी करत त्याने आपल्या फलंदाजीतील कर्तृत्वाची खास झलक दाखवून दिली. त्याने झळकावलेले अर्धशतक या स्पर्धेतील सर्वात जलद अर्धशतकही ठरले.
गोलंदाजीचा तर विषयच नाहीकाबुल आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानात एमो शार्क्स विरुद्धच्या सामन्यात आधी राशिद खान याने गोलंदाजीतील आपलं मॅजिक दाखवलं. राशिद खान याने नाणेफेक गमावल्यानंतर त्याच्या संघावर पहिल्यांदा फिल्डिंग करण्याची वेळ आली. एमो शार्क्स संघाने १७ षटकात ३ विकेट्सच्या मोबदल्यात १६६ धावा केल्या. राशिद खान याने ३ षटकात २० धावा खर्च करून एक विकेट घेतली होती.
संघ कमी पडला, पण कॅप्टन जबरदस्त लढला!
धावांचा पाठलाग करताना टायगर्सची अवस्था बिकट होती. अवघ्या २० धावांत अर्धा संघ तंबूत परतला होता. २.४ षटकांचा खेळ झाला असताना कॅप्टन राशिद खान मैदानात उतरला. त्याने अफलातून बॅटिंग करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. इकराम अली याच्या साथीनं त्याने ७३ धावांची भागीदारी केली. २६ चेंडूतील ५३ धावांच्या खेळीत राशिदं एक से बढकर एक शॉट मारून लक्षवेधलं. त्याच्या भात्यातून ट्रेंडी 'नो-लुक' सिक्स, सिग्नेचर 'नागिन शॉट' पाहायला मिळाले. संघाला टार्गेट पार करता आले नसले तरी राशिदनं आपल्या फलंदाजीनं सर्वांची मन जिंकली.