आयपीएल २०२३ मधील आज पहिला क्वालिफायर सामना गुजरात टायटन्सविरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात खेळवला जाणार आहे. चेन्नईतील चेपॉक स्टेडिअमवर दोन्ही संघामध्ये लढत होणार आहे. विजेता संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरेल तर पराभूत संघाला दुसरा क्वालिफायर सामना खेळावा लागेल.
विशेष म्हणजे चार वेळा विजेतेपद पटकावलेल्या चेन्नई संघाला आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत गुजरात विरोधातील एकही सामना जिंकता आलेला नाही. आतापर्यंत चेन्नईने गुजरातविरुद्ध ३ सामने खेळले आहेत. मात्र या तीनही सामन्यात गुजरातने बाजी मारली आहे. त्यामुळे आज गुजरातवर मात करुन चेन्नई अंतिम फेरीत प्रवेश करणार का?, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
गुजरात संघाने चांगली कामगिरी करत आयपीएलच्या प्लेऑफमध्ये स्थान मिळवले. गुजरातच्या शुभमन गिलने धमाकेदार कामगिरी करत संघाला अनेक वेळा विजय मिळवून दिला आहे. त्यामुळेच यावेळी गिल हा गुजरातचा महत्त्वाचा खेळाडू आहे. याचदरम्यान सेहवागने सीएसकेविरुद्धच्या पहिल्या क्वालिफायर सामन्यापूर्वी गुजरातच्या ट्रम्प कार्डबद्दल बोलले आहे. स्टार स्पोर्ट्सवर बोलताना सेहवाग म्हणाला की, शुभमनने शानदार खेळ केला असला तरी गुजरात संघाचा खरा ट्रम्प कार्ड राशिद खान आहे.
आपला मुद्दा ठेवत सेहवाग म्हणाला, 'जेव्हा गुजरात विकेट शोधत असतो तेव्हा कर्णधार राशिदला गोलंदाजी करायला सांगतो आणि हा गोलंदाज विकेट घेण्यात यशस्वीही होतो. समोरील संघाच्या खेळाडूंची भागीदारी तोडण्यात राशिदला यश आले आहे. त्यामुळेच रशीद यंदाच्या मोसमात सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे. माझ्या दृष्टीने रशीद खान हे गुजरात संघाचा खरा ट्रम्प कार्ड आहे, असं सेहवागने सांगितले. यंदाच्या हंगामात राशिदने आतापर्यंत २४ विकेट्स घेतल्या आहेत.
खेळपट्टीचे स्वरूप मंद
चेपॉकच्या खेळपट्टीचे मंद स्वरूप ओळखून धावा काढणे गुजरातसाठी आव्हान असेल. पॉवर प्लेमध्ये दीपक चाहर तर डेथ ओव्हरमध्ये मथिसा पथिराना यांचा मारा सामन्यात महत्त्वाचा असेल. अशावेळी हार्दिक आणि नेहरा यांना श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाका याच्याकडून सल्ला घ्यावा लागेल. शनाकाला अष्टपैलू म्हणून संधी दिली जाईल, पण नाणेफेकीचा कौल पाहून डावखुरा फिरकीपटू साईकिशोर यालादेखील संधी मिळण्याची शक्यता नाकारता येणार नाही.