बाबर आजमच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पाकिस्तानचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील प्रवास साखळी फेरीतच संपुष्टात आला. पाकिस्तानचा संघ सुपर ८च्या शर्यतीतून बाद झाला आणि त्यांचा साखळी गटातील शेवटचा सामना आज आयर्लंडविरुद्ध होणार आहे. पाकिस्तानच्या या निराशाजनक कामगिरीवर माजी खेळाडू सडकून टीका करताना दिसत आहेत. वासीम अक्रम रोज पाकिस्तान संघाचे वाभाडे काढत असताना माजी क्रिकेटपटू रशीद लतीफने ( Rashid Latif ) पाकिस्तान संघाच्या स्पर्धेतून बाहेर पडण्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे. संघाच्या पराभवासाठी त्याने ICCला जबाबदार धरले आहे.
फ्लोरिडामध्ये अमेरिका आणि आयर्लंड यांच्यात सामना होणार आहे. त्याआधी अमेरिका आणि आयर्लंड यांच्यातला सामना पावसामुळे रद्द झाला होता आणि त्याचा फटका पाकिस्तानला बसला. अमेरिकेने ५ गुणांसह अ गटातून सुपर ८ मध्ये भारतापाठोपाठ स्थान पटकावले. २०२२च्या उपविजेत्या पाकिस्तानसाठी यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेतील कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली. पाकिस्तानी खेळाडूंच्या खराब कामगिरीवर संपूर्ण जग टीका करत असताना, रशीदने संघाला पाठिंबा दिला आहे. संघाच्या खराब कामगिरीसाठी त्याने खेळपट्टीला जबाबदार धरले आहे.
विराट कोहलीचे उदाहरण देत माजी कर्णधार रशीद म्हणाला, "तुम्ही प्रत्येक गोष्टीसाठी पाकिस्तानी खेळाडूंना दोष देऊ शकत नाही. त्यांनी चांगली कामगिरी केली, पण खेळपट्टीवरील परिस्थितीमुळे त्यांचे प्रयत्न निष्फळ झाले. त्यांना अमेरिका आणि भारत या दोन्ही संघांविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले, जे त्यांनी जिंकायला हवे होते. परिस्थिती त्यांच्या नियंत्रणाबाहेर गेली होती. विराट कोहलीसारखा फलंदाजही या खेळपट्टीवर धावा करू शकत नाही.''