Join us  

"विराटला संघाबाहेर काढणारा अजून जन्माला आलेला नाही", पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने सुनावले! 

भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीच्या सध्याच्या फॉर्मवरून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2022 10:43 AM

Open in App

कराची - भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीच्या खराब फॉर्ममुळे त्याचा संघातील स्थानाबाबत सतत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कपिल देव यांनी तर विराटला विश्रांती देण्याचा सल्ला दिल्याने क्रिकेट वर्तुळात एक नवीन वाद निर्माण झाला आहे. आता या वादात पाकिस्तानचा माजी कर्णधार राशिद लतीफने उडी घेत सूचक विधान केले आहे. भारतात अजून असा एकही निवडकर्ता जन्माला आलेला नाही जो विराटला संघातून बाहेर काढेल, अशा शब्दांत त्याने कोहलीच्या विरोधकांना सुनावले. ३३ वर्षीय विराट कोहली सध्या त्याच्या कारकिर्दीतील सर्वात खराब फॉर्मचा सामना करत आहेत. 

भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून, तिथे ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळत आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात कोहलीला विश्रांती देण्यात आली होती. दरम्यान पहिल्या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला मात्र दुसऱ्या सामन्यात इंग्लिश संघाने विजय मिळवून मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. दुसऱ्या सामन्यात कोहलीने २५ चेंडूत केवळ १६ धावा करून पुन्हा एकदा सर्वांना निराश केलं. याआधी झालेल्या टी-२० मालिकेत देखील त्याला साजेशी खेळी करण्यात अपयश आले होते. 

"विराटला बाहेर काढेल असा जन्माला यायचाय'पाकिस्तानचा माजी कर्णधार राशिद लतीफ यूट्यूब चॅनेलवरून संवाद साधत असताना त्याने कोहलीच्या विरोधकांना चांगलेच सुनावले. विराट कोहलीला भारतीय संघातून बाहेर काढले तर... या प्रश्नावर लतीफने आक्रमक होत म्हटले की, भारतात असा कोणताच निवडकर्ता झाला नाही जो विराट कोहलीला संघातून बाहेर काढेल. 

तीन वर्षांपासून शतकापासून वंचित उल्लेखनीय बाब किंग कोहलीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मागील ३ वर्षांपासून एकही शतकीय खेळी करता आली नाही. त्याने शेवटचे शतक बांगलादेशविरूद्ध कोलकातामध्ये कसोटी सामन्यात झळकावले होते. त्यामुळे कोहलीचे चाहते त्याच्या ७१ व्या आंतरराष्ट्रीय शतकाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र दिवसेंदिवस कोहलीची डोकेदुखी वाढत असून त्याच्या खेळीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. 

वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी दिला आरामविराट कोहलीला वेस्ट इंडिजविरूद्ध होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. बीसीसीआयच्या या निर्णयाचे काही प्रमाणात स्वागत केले जात आहे. तर काही दिग्गजांनी सततच्या विश्रांतीमुळे त्याचा फॉर्म गेला, असा दावा केला आहे. मात्र कोहलीला विश्रांती दिल्यामुळे संघाला कितपत फायदा होतो ते पाहण्याजोगं असेल.

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघबीसीसीआयविराट कोहलीकपिल देव
Open in App