चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ वरुन पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि बीसीसीआय यांच्यात संघर्ष होण्याची चिन्हं आहेत. पुढील वर्षी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. पण, बीसीसीआयने नेहमीच भारतीय संघाला पाकिस्तानात पाठवण्यास नकार दर्शवला आहे. आशिया चषकाप्रमाणे टीम इंडियाचे सामने पाकिस्तानात न होता तटस्थ ठिकाणी खेळवले जातील अशी चर्चा आहे. मात्र, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी या चर्चा केवळ अफवा असल्याचे स्पष्ट केले. तसेच बीसीसीआयने तटस्थ ठिकाणी भारताचे सामने खेळवावेत अशी कोणतीही मागणी केली नसल्याचे त्यांनी सांगितले. अशातच पाकिस्तानचा माजी खेळाडू राशिद लतीफ म्हणाला की, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी होकार कळवला आहे. त्यामुळे त्यांना पाकिस्तानात यावे लागेल. जर ते आमच्या देशात आले नाहीत तर आम्ही या स्पर्धेत खेळणार नाही.
"आयसीसीची स्पर्धा असो की मग द्विपक्षीय मालिका... भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत होणार असेल तर केवळ बीसीसीआयशी चर्चा केली जाते. आशिया चषक पाकिस्तानात खेळवला गेला मात्र नेहमीप्रमाणे टीम इंडिया इथे आली नाही. आतादेखील भारत सुरक्षेचे कारण सांगून इथे येण्यास नकार कळवत असेल तर हे चुकीचे आहे", असेही लतीफने म्हटले. तो पाकिस्तानातील एका वृत्तवाहिनीवर बोलत होता.
PCB चा BCCI ला इशारा चॅम्पियन्स ट्रॉफी तटस्थ ठिकाणी होईल अशी कोणाशीच चर्चा झालेली नाही. बीसीसीआयने जरी अशी मागणी केली तरी याला आमचा विरोध असेल. क्रिकेटमध्ये राजकारण येता कामा नये. आयसीसी किंवा बीसीसीआय... यापैकी कोणीच आम्हाला पाकिस्तानात येणार नसल्याचे पत्र दिले नाही. आम्ही नेहमीच भारतात खेळण्यास तयारी दर्शवली आहे. अनेकदा आम्ही कमीपणा घेतला असला तरी यावेळी आम्ही तसे कदापि करणार नाही, असे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी स्पष्ट केले.
PCB ने दिली होती माहिती...काही महिन्यांपूर्वीच पीसीबीने आयसीसीला प्रस्तावित (संभाव्य) वेळापत्रक पाठविले होते. याच वेळापत्रकानुसार स्पर्धेची घोषणा करण्यासाठी आयसीसीकडे पीसीबीची मागणी.पीसीबीने प्रस्तावित केलेल्या वेळापत्रकानुसार १ मार्च २०२५ रोजी लाहोर येथे भारत-पाकिस्तान लढत रंगणार आहे.प्रस्तावित वेळापत्रकानुसार सुरक्षेच्या कारणामुळे भारताचे सर्व सामने लाहोर येथेच खेळविण्यात येणार आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या आयोजनासाठी कराची, लाहोर आणि रावळपिंडी येथील स्टेडियम्सच्या नूतनीकरणासाठी पीसीबी सुमारे १३ अब्ज रुपये खर्च करत आहे.