Join us
Daily Top 2Weekly Top 5

समर्पित वृत्तीमुळे राशिद ठरला लोकप्रिय : सुनील गावसकर

राशिदची समर्पितवृत्ती फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात मैदानावर जाणवत असल्याने चाहते त्याला पसंत करतात.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2024 05:34 IST

Open in App

नवी दिल्ली : क्रिकेटमधील सर्व प्रकारांत अफगाणिस्तानचा लेग स्पिनर राशिद खान हा स्वत:ला झोकून देतो. समर्पित वृत्तीच्या बळावर जगभरातील टी-२० लीगमध्ये तो सर्वांच्या आवडीचा खेळाडू ठरल्याचे मत माजी दिग्गज सुनील गावसकर यांनी व्यक्त केले. राजस्थानविरुद्ध राशिदने ११ चेंडूंत नाबाद २४ धावा ठोकून काल गुजरातला विजय मिळवून दिला. त्याआधी त्याने चार षटकांत १८ धावा देत एक गडी बाद केला होता. स्टार स्पोर्ट्स लाइव्हमध्ये गावसकर म्हणाले, ‘गरजेनुसार राशिदने फलंदाजीत चुणूक दाखविली. याच कारणास्तव जगभरातील लीगमध्ये त्याला मागणी आहे.

राशिदची समर्पितवृत्ती फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात मैदानावर जाणवत असल्याने चाहते त्याला पसंत करतात. गोलंदाजी आणि फलंदाजीशिवाय राशिद हा उत्कृष्ट क्षेत्ररक्षकदेखील आहे. चेंडू पकडताना तो स्वत:ला झोकून देतो. गोलंदाज अनेकदा स्वत:चा चेंडू रोखण्याचादेखील प्रयत्न करीत नाही; कारण त्यांना खांद्याला दुखापत होण्याची भीती वाटते. कारकीर्द संपेल याची चिंता असते. राशिदचे तसे नाही.  तो १०० टक्के योगदान देतो.’

गावसकर यांनी राशिदची तुलना इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्स याच्याशी केली. स्टोक्स यंदा आयपीएल खेळत नाही. ते म्हणाले,‘ बेन स्टोक्स यंदाच्या सत्रात नसला तरी तोदेखील राशिदप्रमाणे स्वत:ला झोकून देतो.’ गुजरातचा युवा कर्णधार शुभमन गिलच्या कामगिरीचेही गावसकर यांनी कौतुक केले आहे.......

टॅग्स :सुनील गावसकरअफगाणिस्तान