Ratan Naval Tata Passes Away When Ratan Tata Says I Have No Connection To Cricket Whatsoever : जगप्रसिद्ध भारतीय उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांनी वयाच्या ८६ व्या वर्षी जगाचा निरोप घेतलाय. देशाची आन, बान आणि शान जपणारे व्यक्तिमत्व अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. आता त्यांच्या जाण्याने देशावर शोककळा पसरली आहे. वेगवेगळ्या क्षेत्रासह क्रिकट जगतातूनही रतन टाटांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. ते जरी आज आपल्यात नसले तरी त्यांचे विचार अन् त्यांच्या प्रवासाची गाथा प्रत्येकाला एक नवी ऊर्जा आणि प्रेरणा नक्कीच देत राहिल. वेगवेगळ्या क्षेत्रासह क्रिकेटमध्येही त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे.
रतन टाटा अन् क्रिकेटसंदर्भातील ती गोष्ट
प्रायोजकाच्या माध्यमातून टाटा समूह क्रिकेटमधील आयपीएल स्पर्धेशीही कनेक्ट आहे. ही गोष्ट प्रत्येकालाच माहिती आहे. पण एक गोष्ट अशीही घडली होती ज्यामुळे रतन टाटांनी थेट क्रिकेटशी माझा काही संबंध नाही, असे म्हणण्याची वेळ आली होती. ते असं का म्हणाले होते? काय घडलं होतं ज्यामुळं रतन टाटा यांनी क्रिकेटशी दूरपर्यंत संबंध नसल्याची भूमिका घेतली होती त्यासंदर्भातील स्टोरी आपण जाणून घेणार आहोत.
क्रिकेटशी माझा काहीही संबंध नाही, नेमकं असं काय घडलं होतं ज्यामुळे रतन टाटांनी अमान्य केलं होत क्रिकेटशी असणारं नातं
भारताचे ज्येष्ठ उद्योगपती आणि टाटा समुहाचे माजी चेअरमन रतन टाटा यांचा देशाचा विकसात मोलाचा वाटा आहे. प्रत्येक क्षेत्रात त्यांनी लाख मोलाचे योगदान दिले आहे. क्रिकेटही त्याला अपवाद नाही. पण २०२३ च्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेवेळी रतन टाटा यांच्या संदर्भात फेक न्यूज चर्चेत आली होती. अफगाणिस्तानच्या संघाने पाकिस्तानला पराभूत केले होते. त्यानंतर रतन टाटा राशिद खानला १० कोटींच बक्षीस देणार आहेत, अशी अफवा पसरली होती. ही गोष्ट वाऱ्यासारखी पसरत असताना रतन टाटा यांनी अधिकृत एक्स अंकाउंटच्या (पूर्वीचे ट्विटर) माध्यमातून एक ट्विट करुन व्हायरल होणाऱ्या गोष्टीत काहीच तथ्य नसल्याचे स्पष्ट केले होते. रतन टाटा यांनी ३० ऑक्टोबर २०२३ रोजी केलेल्या आपल्या त्या ट्विटमध्ये क्रिकेटशी माझा काही संबंध नाही, असा उल्लेख केला होता.
काय होतं रतन टाटांनी केलेले ते ट्विट?
मी आयसीसी किंवा अन्य कोणत्याही क्रिकेट बोर्डाला कोणत्याही क्रिकेटसंदर्भात दंड किंवा बक्षीस देण्यासंदर्भात सूचना केलेली नाही. माझा क्रिकेटशी काहीही संबंध नाही. कृपया माझ्या अधिकृत अकाउंटवरून शेअर न झालेल्या अन्य माध्यमातून पसरणाऱ्या अशा प्रकारच्या व्हॉट्सअप फॉरवर्ड किंवा व्हिडिओवर विश्वास ठेवू नका.